Monday, May 27, 2024
Homeअग्रलेखकेवळ कबुली पुरेशी?

केवळ कबुली पुरेशी?

रस्ते अपघात घडला की सामान्यतः चालकाला जबाबदार ठरवले जाते. क्वचित बघे मारहाण देखील करताना आढळतात. तथापि सगळेच अपघात चालकाच्या चुकीमुळेच होतात असे नाही तर खराब रस्ते आणि सदोष रोड इंजिनियरिंग हे देखील अपघातांचे एक प्रमुख कारण असल्याची मनमोकळी कबुली रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिली.

रोड इंजिनिअरिंग म्हणजे रस्त्यांची रचना, गुणवत्ता आणि देखभाल. दरवर्षी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त अपघात होतात. त्यात दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. तीन लाख लोक जखमी होतात. दोन्ही प्रकरणामध्ये तरुण लोकांचे प्रमाण जास्त आहे. देशाच्या भविष्याचा असा मृत्यू होणे क्लेशदायक आहे, अपघातात त्यांचीही चार हाडे मोडली होती असेही गडकरी म्हणाले. गडकरी यांनी गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. रस्ते अपघात गंभीर आहेतच पण त्यात युवांचा मृत्यू होणे त्याहूनही जास्त गंभीर आहे. रस्त्याचे सदोष रोड इंजिनिअरिंग नाशिककरांच्याही परिचयाचे आहे. पावसाळ्यात उड्डाण पुलावर साचणारे पाणी, पुलावरुन खाली वाहाणारे छोटे धबधबे, शहरात ठिकठिकाणी साचणारे पाणी आणि खड्यात गेलेले रस्ते ही त्याची काही उदाहरणे. स्मार्ट सिटीने बांधलेल्या सीबीएस ते अशोकस्तंभ या रस्त्यावरून जाताना वाहनचालक आणि त्यांच्या मागे बसलेल्या लोकांना उंटावर बसल्याचा भास होतो अशी भावना व्यक्त होताना आढळते. पण सदोष बांधकाम हा लोकांचा दोष नाही. तरीही त्याची शिक्षा मात्र तेच भोगतात.

- Advertisement -

अनेक कुटुंबे त्यांच्या घरातील कर्ती व्यक्ती गमावतात. कायमचे दुःख पदराला बांधून घेतात. रस्ते अपघातात येणारे दुर्धर अपंगत्व म्हणजे रोजचेच मरण नाही का? सरकारी नाकर्तेपणाचे परिणाम वाहनचालकांनी का भोगावेत? देशात लाखो कोटी रुपयांचे हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले जातात. जायलाही हवेत. रस्ते विकासाचा मार्ग प्रशस्त करतात. समृद्धी महामार्गाची लोकांना प्रतीक्षा होती. तो वापरण्यासाठी खुला झाला तेव्हा एकदा तरी त्यावरून वाहन चालवण्याची इच्छा अनेक वाहनचालकांनी माध्यमांकडे व्यक्त केली होती. तथापि तो मार्ग अपघातांमुळेच जास्त चर्चेत राहिला. अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे का बनतात? महामार्गांची दुरवस्था ही वेगळीच समस्या आहे. रस्ते अपघातमुक्त असावेत ही अपेक्षा गैर म्हणता येईल का? केंद्रातील कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. सडेतोड आणि मनमोकळे बोलण्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत.

स्वतःच्याच खात्याच्या अकार्यक्षमतेची कबुली कोणत्या खात्याचे मंत्री देतात? गडकरींनी मात्र ती दिली आहे. तथापि नुसती कबुली पुरेशी ठरेल का? त्यामुळे अपघात कमी होणे शक्य होऊ शकेल का? कदाचित गडकरी यांनाही त्याची कल्पना असावी. रोड इंजिनियरिंगची कठोर अंमलबजावणी हे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. रस्ते बांधणी, त्याची गुणवत्ता आणि देखभाल सरकारनेच करायला हवी. गडकरी या उणीवा दूर करतील अशी लोकांना आशा आहे. अर्थात त्यांनी कबुली दिली म्हणून वाहनचालकांच्या बेदरकारपणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अती वेगाची नशा आणि नियमांना हरताळ फासणे जणू काही फॅशनच झाली आहे. सदोष रोड इंजिनियरिंगमध्ये मानवी चुका अपघातांचे प्रमाण वाढवतात. बळींच्या संख्येत भर घालू शकतात. हे वाहनचालकांना विसरून चालणार नाही. सावधानता आणि नियमांचे पालन याला पर्याय नाही याची खूणगाठ वाहनचालकांनी मनाशी बांधलेली बरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या