ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या झपाट्याने प्रसारामुळे आणि त्यामुळे होणार्या नगण्य मृत्यूमुळे आशा निर्माण झाली आहे की हा करोना व्हायरस साथीच्या रोगाचा हा शेवटचा टप्पा आहे. मागच्या शंभर वर्षांतील मोठ्या महामारीचा विचार केला तर याच मार्गाने महामारीचा शेवट झाला आहे. त्यामुळे भविष्यात समजा जर करोना विषाणूमध्ये अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही. एका ठराविक काळानंतर हा करोनाचा विषाणू पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणार्या सर्दी, तापाच्या विषाणूसारखा होईल आणि पुढे त्याची नवीन म्युटेशन येतील, पण ती धोकादायक नसतील.
गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरातील लोकांच्या मनात घर करून राहिलेला आणि पुन्हा पुन्हा डोकावणारा प्रश्न म्हणजे ‘करोना कधी जाईल?’ या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर आहे – ‘करोना जाणार नाही’. तो समाजामध्ये राहणारच! पण तो सर्वसामान्य सर्दी आणि खोकल्यामध्ये बदलून जाईल. या बदलाची सुरुवात झाली असून डेल्टानंतर आलेला करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन हा त्याचाच प्रकार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकाच दिवशी 12 कोटी लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला होता. ही संख्या दुसर्या लाटेतील एका दिवसाच्या रुग्णसंख्येच्या दहापट अधिक होती, तर त्याच दिवसाचा मृत्यूचा आकडा मात्र दुसर्या लाटेच्या पन्नासपट कमी होता. यावरूनच दिसून येत आहे की, आपण कोविडच्या शेवटाकडे निघालो आहोत. साधारणपणे ज्या दिवशी फक्त करोनाच्या संसर्गामुळे कमीत कमी किंवा अगदी नगण्य मृत्यू नोंदवले जातील मात्र रुग्णसंख्या हजारो किंवा लाखो असतील तेव्हा कोविड परतीच्या मार्गावर आहे, असे म्हणता येईल.
जानेवारी 2022 ते मार्च 2022 या तीन महिन्यांच्या कालावधीत जगातील 50 टक्के लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होऊन गेलेला असेल, असा अंदाज ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेच्या सहा राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य सल्लागार राहिलेले प्रसिद्ध संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. फुकूची यांच्या म्हणण्यानुसार जगभरातील ओमायक्रॉनचा सर्वात मोठा सर्वोच्च बिंदू फेब्रुवारीमध्ये येईल आणि त्यानंतर तो हळूहळू कमी होत जाईल. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या आपण कोविडमधून मुक्ती मिळण्याच्या योग्य दिशने जात आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या झपाट्याने प्रसारामुळे आणि त्यामुळे होणार्या नगण्य मृत्यूमुळे आशा निर्माण झाली आहे की हा करोना व्हायरस साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा आहे.
या आशेचा आधारही संसर्गजन्य रोगाच्या इतिहासात आहे. मागच्या शंभर वर्षांतील मोठ्या महामारीचा विचार केला तर याच मार्गाने महामारीचा शेवट झाला आहे. संपूर्ण जगभरात संसर्गजन्य परंतु कमी प्राणघातक प्रकारातील विषाणू लोकसंख्येच्या मोठा भाग व्यापतो तेव्हा तो त्या लोकसंख्येमध्ये एक व्यापक संरक्षणात्मक छत्र तयार करू शकतो. अशा प्रकारचे संरक्षणात्मक छत्र लसीमुळे तयार झालेल्या संरक्षणासारखेच असते आणि त्यामुळेच तो विषाणू स्थानिक प्रकारचा बनतो. म्हणजेच एका ठराविक काळानंतर हा करोनाचा विषाणू हा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात येणार्या सर्दी, तापाच्या विषाणूसारखा होईल आणि पुढे त्याची नवीन म्युटेशन येतील, पण ती धोकादायक नसतील. हा बदललेला पण कमी तीव्रतेचा विषाणू प्रसारित होत राहील; परंतु लस आणि सामूहिक संसर्गाच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे संक्रमण कमी होईल, गंभीर आजार आणि मृत्यू फार कमी होतील आणि जीवन महामारीपूर्वीच्या सामान्य स्थितीत परत येऊ शकेल.
जीवन पूर्वीसारखे कधी होईल?
कोविडची साथ सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न साचून राहिला आहे. दोन वर्षे झाले याचे उत्तर सापडले नाही. पण आपल्याला आठवत असेल तर कोविडच्या साथीची सुरुवात झाल्यापासून अनेक देशांतील शास्त्रज्ञ सांगत होते की, आपले आयुष्य आणि हे संपूर्ण जग दोनच भागात विभागले जाईल. एक म्हणजे कोविडपूर्वीचे जग आणि कोविडनंतरचे जग. आपण आपल्या कोविडपूर्वीच्या जगात आहे तसे जाऊच शकत नाही किंवा हे जग पुन्हा पूर्वीसारखे होणारच नाही. गेल्या दोन वर्षांत आपल्या आयुष्यात आणि संपूर्ण जगाच्या दैनंदिन व्यवहारात अनेक बदल झाले आहेत. यातील अनेक बदल जरी कोविड निघून गेला तरी आहे तसेच पुढे राहतील आणि आपणही त्या बदलांना जुळवून घेतलेले असेल.
पण सध्या भारतामधील तिसर्या लाटेची जी तीव्रता आणि होणारे मृत्यू यांचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आपण नॉर्मल दैनंदिन व्यवहाराकडे वळू शकू. साधारपणे जिथे जिथे ओमायक्रॉनची मोठी लाट आली त्या सर्व देशांमध्ये हीच परिस्थिती दिसून आली आहे. ज्या वेगाने ओमायक्रॉनची लाट आली त्याच वेगाने ती ओसरली आहे. भारतामध्येसुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती राहील. आपली लोकसंख्या जरी मोठी असली तरी दुसर्या लाटेच्या दुप्पट ते तिप्पट रुग्णसंख्या दिसून येईल, मात्र मृत्यू फारच कमी राहतील. ही परिस्थिती आपल्यासाठी आपले जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आशादायी असेल.
जीवन जरी पूर्वीसारखे होणार नसले तरी झालेले काही बदल भविष्यासाठी गरजेचेच असतील. उदारणार्थ, पूर्वी लोक आपल्या वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देत नव्हते, घरातील किंवा सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छेतेकडे दुर्लक्ष करत होते. कोविडनंतरच्या जगात आपल्याला हे बदलेले दिसून येईल किंवा सध्या हा बदल दिसून येत आहे. लोक मास्कचा वापर स्वतःहून करतील ज्यामुळे प्रदूषण, धूळ आणि वातावरणीय बदलामुळे होणारे विषाणूजन्य आजार यांच्यापासून आपले संरक्षण होईल.
भविष्यात करोना पुन्हा येईल का?
करोना कधी जाईल या प्रश्नाइतकाच हासुद्धा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे किंवा विचार करायला लावणारा आहे. आपल्याला साधारणपणे माहीत असलेल्या मागील 500 वर्षांच्या इतिहासात डोकावून पहिले तर एकाच प्रकारच्या विषाणूची साथ पुन्हा पुन्हा आली नाही किंवा त्या विषाणूची साथ जाऊन पुन्हा दहा-वीस किंवा पन्नास-शंभर वर्षांनी पुन्हा आली नाही. त्यामुळे भविष्यात करोना विषाणूची साथ पुन्हा येईल ही शक्यता फारच कमी आहे. समजा जर करोना विषाणूमध्ये अनेक प्रकारचे बदल होऊन जरी तो पुन्हा आला तरी त्यामुळे पुन्हा जग बंद करण्याची गरज पडणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आताच्या कोविडच्या साथीत जगातील 70 ते 80 टक्के लोकसंख्येला लसीमुळे किंवा करोनाचा संसर्ग झाल्यामुळे प्रतिकारशक्ती तयार झाली आहे आणि हीच प्रतिकारशक्ती भविष्यातील करोनाची लाटसुद्धा सहजच थांबवू शकते.
उदाहरणच द्यायचे झाले तर ज्या लोकांना कोविडच्या पहिल्या लाटेत संसर्ग झाला त्यामधील 10 टक्के लोकांनाच दुसर्या लाटेत पुन्हा संसर्ग झाला आणि त्या लोकांचे मृत्यू मात्र अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके झाले. ज्या लोकांना पहिल्या आणि दुसर्या लाटेत करोनाचा संसर्ग झाला त्या लोकांना तिसर्या लाटेत करोनाचा संसर्ग झालेलासुद्धा समजले नाही आणि अशा लोकांच्या मृत्यूची नोंदसुद्धा सापडली नाही. याउलट या तिन्ही कोविडच्या लाटा मात्र बदलून आलेल्या करोना विषाणूमुळे आल्या. यावरून भविष्यातील परिस्थिती अधिक स्पष्ट होत आहे. जरी करोना विषाणूमध्ये नवीन बदल झाले तरी त्यामुळे अत्यंत जीवघेणी लाट येणार नाही. यामध्ये कोट्यवधी लोकांना एकाचवेळी झालेला ओमायक्रॉनचा संसर्ग आणि त्याचबरोबर त्यांना दिलेली लस या दोन्हींचा एकत्रित परिणाम आहे.
खरेच करोनाचा अंत होईल?
निसर्गाचा एक साधा नियम आहे, निसर्गामध्ये जेवढी मोठी वस्तू तेवढा तिचा अंत सोपा असतो; याउलट जेवढी लहान वस्तू तेवढा तिचा अंत अवघड असतो. उदाहरणच बघूया. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर महाकाय असे डायनोसॉर प्राणी होते, त्याचवेळी पृथ्वीवर विषाणू आणि मुंगीही होती. निसर्गातील एका घटनेमुळे महाकाय असे डायनोसॉर प्राणी नष्ट झाले, मात्र लाखो वर्षांनी आजही मुंगी आणि विषाणू आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर मानवी हस्तक्षेपामुळे वाघ, चित्ते, हत्ती हे नष्ट होण्याचा मार्गावर आहेत, पण मानवाने कितीही हस्तक्षेप केला तरी तो मुंगीला नष्ट करू शकणार नाही. विषाणू तर मुंगीपेक्षा लाखो पटींनी लहान आहे. मानव त्याला नष्टच करू शकणार नाही. अशाच प्रकारे करोना विषाणूसुद्धा काही प्राण्यांमध्ये किंवा मानवी शरीरातच राहू शकतो. याचे अलीकडचे उदाहरण म्हणजे क्षयरोगाचा जिवाणू. क्षयरोग समाजातून संपूर्णपणे नाहीसा जरी झाला नसला तरी त्याचे प्रमाण गेल्या 25 वर्षांत कित्येक पटीने कमी झाले आहे. मात्र अलीकडच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, हा जिवाणू कोट्यवधी लोकांच्या शरीरात निपचिप पडून आहे, जेव्हा मानवाची प्रतिकारशक्ती खूपच कमी होते तेव्हा तो पुन्हा त्रासदायक ठरतो. विषाणू इतकी वर्षे मानवी शरीरात निपचिप पडून राहणे शक्य नसते, पण कदाचित तो इतर प्राण्यांमध्ये त्यांना कोणताही त्रास न देता निपचिप राहील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे करोनाचा अंत होणारही नाही आणि पुन्हा भविष्यात फक्त याच करोनामुळे जग बंद करण्यासारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होणार नाही. या दोन्ही शक्यता तेवढ्याच बरोबर असतील.
डॉ. नानासाहेब थोरात, ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन
(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथील मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)