Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखसमाजभान कधी जागे होणार?

समाजभान कधी जागे होणार?

बदल हा काळाचा स्थायीभाव आहे असे म्हंटले जाते. तथापि कालबाह्य रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धांचा पगडा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होताना आढळतो. तो पगडा इतका भारी असतो की, त्यासाठी माणसे प्रसंगी माणुसकी आणि सहवेदना देखील विसरू शकतात. सोलापूरमध्ये नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली.

एका घरमालकाच्या भाडेकरूच्या नातेवाईकचे निधन झाले. तथापि त्या दिवशी अमावस्या होती म्हणून घरमालकाने मृतदेह घरात आणू दिला नाही. परिणामी भाडेकरूला तू मृतदेह रात्रभर घराबाहेर ठेवावा लागला. यासंदर्भातील वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या अशा अनेक घटना घडतात. गुप्तधनासाठी माणसे दुसऱ्याच्या लेकराचा नरबळी द्यायला धजावतात. आजारी पडलेल्या व्यक्तीला तथाकथित मांत्रिकाकडे नेतात. पैशाचा पाऊस पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या भोंदूंच्या कच्छपी लागतात. त्यांच्यावर लाखोंची उधळण देखील करतात. ‘ नवसे पुत्र होती, तरी का करावा लागे पती’ असे संत तुकाराम महाराज यांनी म्हंटले आहे. तरीही माणसे पोटी संतान जन्माला यावे यासाठी स्वयंघोषीत बाबा बुवांचे आश्रम शोधत देशभर फिरतात. सर्वच संतांनी अंधश्रद्धांवर कठोर प्रहार केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला. ‘देव बाजारचा भाजीपाला नाही रे ‘ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. देव सर्वाठायी वसे, परी न दिसे अभाविका’ असे संत एकनाथ महाराजांनी सांगितले, तरी घरमालकाला भाडेकरूंच्या वेदना का जाणवल्या नसाव्यात? त्याच्या दुःखात सहभागी व्हावे असे का वाटले नसावे? पोटी मूल जन्माला यावे या इच्छेपोटी माणसे त्यांच्या बायकांना एखादया तथाकथीत आश्रमात सोडून कसे जाऊ शकतात? हा शिक्षणाचा पराभव मानावा की माणसांच्या अडेलतट्टूपणाचा? शिक्षणाने बुद्धीचा विकास होईल, माणसे विचार करू लागतील. चांगल्या-वाईटाची समज वाढेल अशी शिक्षणपसारकांची अपेक्षा होती. अनेकांनी शिक्षण प्रसारासाठी आयुष्य वेचले. पण शिकलेली माणसेही प्रसंगी अंधश्रद्धांचा आसरा घेतात त्यांना काय म्हणावे? सामाजिक सुधारणा व्हाव्यात, अंधश्रद्धांचा विळखा सैल व्हावा असे कोणालाच वाटत का नसावे? अपवाद वगळता सामाजिक संस्था आणि राजकारण्यांसाठी हा विषय प्राधान्याचा का नसावा? जादूटोणाविरोधी कायदा करून सरकारची जबाबदारी संपते का? असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य म्हणून नेतेमंडळी नेहमीच त्यांची पाठ थोपटून घेतात. तथापि त्यांच्या मतदार संघात का होईन पण जनजागृतीचे कार्यक्रम राबवले का जात नसावेत?. अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या घटनांना आळा घालणे, कायद्याची कठोर अमलबजावणी करून त्याचा धाक निर्माण करणे ही सरकारचीच जबाबदारी आहे. याचा विसर सरकारला पडला असावा का? प्रागतिक विचार स्वीकारून अमलात आणण्याचे भान लोकांनाही कधी येणार? उद्धार संत न करिती। मार्ग सांगती जनांपति। त्यांच्या बोधवचने प्रगती। केली पाहिजे साधके।।असा उपदेश संत तुकडोजी महाराजांनी केला आहे. त्यातील मर्म लोक लक्षात घेतील का? संतांनी आखून दिलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वाटेवर चालू लागतील का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या