Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखसामाजिक उदासीनता कधी दूर होणार?

सामाजिक उदासीनता कधी दूर होणार?

सामाजिक अस्वस्थता दिवसेदिवस वाढत आहे. वाढते क्रौर्य, वाढती आक्रमकता आणि सहिष्णूतेचा संकोच ही मानवतेसमोरची मोठीच आव्हाने आहेत. क्षुल्लक कारणांसाठी माणसे एकमेकांचा जीव घेत आहेत. वाट भरकटलेली कोवळ्या वयातील काही मुले थंड डोक्याने त्यांच्याच मित्राची हत्या करत आहेत. माणसे झुंडशाहीला किडामुंगीसारखी बळी पडत आहेत. एका जमावाने उठावे आणि दुसर्‍या जमावातील माणसांची डोकी फोडावीत अशा घटना सातत्याने घडत आहेत.

एकमेकांप्रती वाढती असहिष्णूता माणसे रोजच अनुभवत आहेत. जमावाची हिंस्त्रता बघून आपण अस्वस्थ होतो का आणि आपण ती अस्वस्थता व्यक्त करत आहोत का, असा प्रश्न ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर यांनी विचारला आहे. सर्वसमावेशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या. एक अत्यंत ज्वलंत प्रश्न प्रभाताईंनी श्रोत्यांसमोर उपस्थित केला आहे.

- Advertisement -

वास्तविक हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारावा अशीच सद्यस्थिती आहे. हिंसा आणि क्रौर्याचे दाखले देणार्‍या घटना माध्यमात प्रसिद्ध होतात. समाजात दुसरे काही घडतच नसावे अशी शंका जाणत्यांना यावी इतपत या घटनांचे प्रमाण वाढत आहे. तथापि समाजात यासंदर्भात जागरुकता आणि विवेकाचा अभावही आढळतो. माणसे आपसात या मुद्यांवरुन चर्चा करतात. दोन व्यक्ती एकेमकांना भेटल्या तरी बोलताना, सध्याचे वातावरण फारसे बरे नाही, माणसांना काय झालेय तेच कळत नाही असे नक्कीच म्हणतात. समाजातील वाढती हिंसा आणि क्रौर्य हा चावडीवरच्या गप्पांचा देखील भाग झाला आहे. पण सार्वजनिकरित्या या मुद्यांवर बोलायला मात्र माणसांची फारशी तयारी आढळत नाही. माणसांना बोलते करण्याचा प्रयत्न करणारांना बर्‍याचवेळा सामुहिक चुप्पीचाच अनुभव येतो.

राजकीय अस्थिरता आणि दंडेलशाहीमुळे माणसे गप्प बसणेच पसंत करत असावीत का? बोललो तर त्याची किंमत मोजावी लागू शकते अशी भावना त्यांच्या मनात असू शकेल का? तथापि फक्त खासगीत चर्चा करुन किंवा आपसात गप्पा मारुन परिस्थिती बदलू शकेल का? सामाजिक अस्वस्थतेला परिणामकारक पद्धतीने तोंड फोडण्याचे काम समाजातील सुशिक्षित मंडळी करु शकतात. पण तसे का घडत नसावे? उलट सुशिक्षित माणसांमध्ये सामाजिक परिस्थितीविषयी उदासीनता आणि काही प्रमाणात भित्रेपणाही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि जाणत्यांच्या अनुभवास येतो.

प्रभाताईंनाही तो कदाचित जाणवला असावा. म्हणुनच त्यांनी ‘व्यक्त होण्याचे भय वाटते का’ असा प्रश्न विचारला आहे. तेव्हा, परिस्थितीत सकारात्मक बदल व्हावा असे वाटत असेल ‘मला काय त्याचे’ हा दृष्टीकोन सुशिक्षित मंडळींना सोडून द्यावा लागेल. समाजाचे अहित साधण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सक्रीय सहभाग नोंदवणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. समाजाचे जबाबदार सुशिक्षित घटक म्हणून सर्वांनाचा जागरुक व्हावे लागेल. पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रव्यववहारात माणसे प्रश्न उपस्थित करायचे. सामाजिक टिप्पणी माणसे करायची. पण आता असा पत्रव्यवहार अभावानेच का आढळतो? माणसे इतकी उदासीन होत चालली आहेत का? सामाजिक परिस्थिती बिघडण्याचे हीच उदासीनता हेही एक प्रमूख कारण नाही का? समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सक्रीय सहभाग ही नागरिक म्हणून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. त्याची जाणीव प्रभाताईंनी करुन दिली आहे एवढेच. 

- Advertisment -

ताज्या बातम्या