Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखस्वच्छतेचे महत्व कधी कळणार?

स्वच्छतेचे महत्व कधी कळणार?

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत महास्वच्छता अभियान राबवले. प्रतिष्ठानचे शेकडो स्वयंसेवक अभियानात सहभागी झालेे. शेकडो टन कचरा संकलित करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, सार्वजनिक स्वच्छता आणि व्यसनमुक्ती अशा अनेक क्षेत्रात धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे निदान काही काळापुरती स्वच्छ होतात. महाराष्ट्रात दिंडोरीस्थित स्वामी समर्थ केंद्रासारख्या अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने सातत्याने स्वच्छता अभियान राबवतात. वेगवेगळे विभाग, सरकारी कार्यालये, मैदाने, नद्या आणि परिसर कचरामुक्त करतात. ‘स्वच्छ भारत अभियान’ हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. खुद्द पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली होती. राज्य सरकारही विविध उपक्रम राबवते. स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठीसुद्धा विविध उपक्रम राबवले जातात, पण शहरे आणि गावे कचरामुक्त होतात का? वारंवार तसे प्रयत्न का करावे लागतात? कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी फक्त सामाजिक संस्थांचीच आहे का? जिथे जिथे माणूस पोहचतो तिथे तिथे कचर्‍याच्या रुपाने अस्वच्छता आणि बेफिकिरीच्या पाऊलखुणा सोडतो. माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर! तेथेही मानवी वावरामुळे कचरा साठायला लागला आहे. एव्हरेस्टवरील कचरा संकलनासाठी देखील आता मोहिमा राबवाव्या लागतात. त्यासाठी हजारो स्वयंसेवकांना स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागतो. लक्षावधी रुपये खर्च करावे लागतात. गिर्यारोहकांनी त्यांचा कचरा बरोबर खाली आणावा, असे आवाहन सातत्याने केले जाते. प्रशांत महासागर पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर! या महासागरात ठिकठिकाणी हजारो टन प्लास्टिक कचर्‍याची छोटी छोटी बेटे तयार होत असल्याचे सांगितले जाते. तात्पर्य डोंगर असो अथवा समुद्र कचर्‍याची ठिकाणे बनत आहेत. घर स्वच्छ करणे म्हणजे घरातील कचरा घराबाहेर फेकून परिसराची कचराकुंडी करणे नव्हे! घराघरातील कचर्‍याचे डबे रिकामे आणि स्वच्छ असतात, पण परिसरात मात्र इतस्तत: कचरा पसरलेला असतो. एकदा वापरून फेकून द्याव्या लागणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे. किती लोक जाणीवपूर्वक त्याचे पालन करतात? ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करुन देण्याचा नियम किती लोक कसोशीने पाळतात? नदीला जीवनदायिनी मानायचे आणि तिच्या पात्रात निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या आणि कचरा टाकायचा, हा विरोधाभास नाही का? मोठ्यांचे अनुकरण लहान मुले करतात. आपला परिसर आपणच स्वच्छ राखायला हवा याची जाणीव लोकांना कधी होणार? स्वच्छतेचे महत्व लोकांना कधी पटणार? स्वच्छतेचे मूल्य कधी रुजणार? सामाजिक संस्था वर्षानुवर्षे स्वच्छता अभियान राबवतील. सरकारे स्पर्धा घेतील. पारितोषिकेही देतील, पण परिसर मात्र अस्वच्छच होत राहतील. म्हणून सार्वजनिक परिसर स्वच्छतेबाबत लोकांनी जागरुकता बाळगली पाहिजे. सार्वजनिक स्वच्छतेबाबतची अनास्था दूर झाली नाही तर परिस्थिती ‘जैसे थे’च राहील आणि त्यातून उद्भवणार्‍या आरोग्य समस्यांची जबाबदारी समाजाची पण असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या