मासिक पाळी हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा पण चर्चेसाठी मात्र महिलांकडूनच वाळीत टाकला गेलेला विषय. मासिक पाळी हा फक्त गर्भधारणेपुरता मर्यादित विषय नाही. महिलांच्या आरोग्याशी मासिक पाळीचे चक्र जोडले गेले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी ते चक्र सुरळीत सुरु राहाणे अत्यंत आवश्यक असते. दुदैर्वाने महिलांच्या एकूणच आरोग्यासाठी महत्वाच्या या चक्राविषयी अनेक जुनाट रुढी आणि गैरसमज समाजात आजही आढळतात. अशाच एका बुरसटलेल्या रुढीला गडचिरोली परिसरातील महिलांनी कायमची सोडचिठ्ठी द्यायचा निर्णय घेतला आहे.
साधारणत: चारशे बायकांनी ‘मी कुर्मा घरात राहाणार नाही’ अशी शपथच घेतली आहे. या महिलांना सामाजिक संस्थांनी बळ दिले आहे. ही प्रथा विशेषत: गडचिरोली परिसरात पाळली जाते. मासिक पाळी आलेल्या महिलेला गावाबाहेर बांधलेल्या एका झोपडीत राहावे लागते. त्याल झोपडीला कुर्मा घर म्हणतात. या झोपडीत कोणत्याही प्रकारच्या सोयी नसतात. झोपडी व तिचा परिसरही अस्वच्छ असतो.
कुर्मा घरात राहाण्याच्या प्रथेमुळे तेथील महिलांना सतत अनारोग्याला सामोरे जावे लागते. कुर्मा घरात काही महिलांचा जीव गेल्याच्या घटना देखील घडल्याचे माध्यमात त्यात्या वेळी प्रसिद्ध झाले आहे. तथापि कुर्मा प्रथा एकदम संपुष्टात येणार नाही हे काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आस्ते कदमचा पवित्रा स्वीकारला. गडचिरोली परिसरातील गावांमध्ये आधुनिक कुर्मा घरे उभारण्याचा मध्यममार्ग पंचायतींनी स्वीकारावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. तथापि 14 गावांमधील महिलांनी थेट या प्रथेचे पालन करणे नाकारले आहे.
तशा आशयाच्या स्वयंघोषणापत्रावर काही महिलांनी स्वाक्षरी केली तर निरक्षर महिलांनी अंगठे उठवले. परिसरातील शंभरपेक्षा जास्त पुरुषांनी देखील महिलांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला हे विशेष. मासिक पाळीशी संबंधित जुनाट रुढी फक्त ग्रामीण भागातच आहेत असे नव्हे. शहरी परिसरात रुढींची शहरी आवृत्ती आढळते इतकेच. शहरी परिसरातील लाखो महिलांना मासिक पाळीचे चार दिवस त्यांच्याच घरात ‘वेगळे’ राहावे लागते. कुर्मा घर नाकारण्याची शपथ घेतलेल्या महिलांना कदाचित विरोधाला सामोरे जावे लागू शकेल. कदाचित पंचायतींच्या दहशतीचा सामना करावा लागू शकेल. त्यांनीच घेतलेली शपथ अंमलात आणण्यात अडचणी येऊ शकतील कदाचित. पण त्यांनी कुर्मा प्रथा नाकारण्याचा निर्धार व्यक्त करुन बदलाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे हेही खरेच नसे थोडके. अशा छोट्या छोट्या पावलांचाच पुढे हमरस्ता होत जातो.
पुरुषप्रधान समाजात महिलांना दुय्यमत्व सहन करावे लागते. सगळ्या प्रकारच्या क्षमता असुनही केवळ परंपरा म्हणून दुय्यमत्व सहन करावे लागणे किंवा सदोदित तसे नाटक वठवणे किती त्रासदायक आणि अपमानकारक असते हे फक्त महिलाच जाणोत. त्यामुळे अनेकींच्या मनात विनाकारण अपराधगंड सतत असतो. नेहमी मागेच राहायचे हे महिलांनीच स्वीकारलेले असते. त्यामुळे अन्यायाला विरोध करायचा असतो हेच अनेकींना जाणवत देखील नसते.
अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या महिलांकडे महिलाच काहीशा हेटाळणीच्या नजरेने पाहातात. समाजही अशा महिलांची अतीशहाणी, आगाऊ अशी संभावना करताना आढळतो. या पार्श्वभूमीवर गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील महिलांनी कुर्मा प्रथेविरोधात उचललेले पाऊल किती क्रांतिकारी आहे याचा अंदाज येऊ शकतो. समाजानेही बदल घडवू पाहाणार्या सर्वच महिलांच्या मागे उभे राहून त्यांची हिंमत वाढवायला हवी. किंबहूना समाजातील संवेदनशील व्यक्तींची ती नैतिक जबाबदारी आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.