Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई ठप्प झाली तेव्हा मुख्यमंत्री, पालकमंत्री कुठे होते?

मुंबई ठप्प झाली तेव्हा मुख्यमंत्री, पालकमंत्री कुठे होते?

आदित्य ठाकरेंचा सवाल

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

परतीच्या पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह अवघ्या राज्याला झोडपून काढले. मात्र, अर्ध्या तासाच्या पावसात मुंबई पाण्याखाली जाऊन रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री तसेच मुंबईचे दोन्ही पालकमंत्री कुठे होते? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे केला.

मुंबई परिसरात बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याशिवाय रस्त्यावर पाणी साचल्याने त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. २००५ मध्ये ढगफुटी झाली तसा काल पाऊस पडला. या पावसात पश्चिम द्रुतगती महामार्ग पाण्याखाली गेला, अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. मुंबई महापालिकेत आमची सत्ता असताना आपत्कालीन काळात सुरू केलेले ट्विटर हँडल त्यावेळी तातडीने मदत करायचे. परंतु, कालच्या पावसात कुठेही मदत दिसली नाही, अशी टीका त्यांनी केली.

राज्य सरकारने अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. पण एकाही रस्त्याचे अर्धा किलोमीटरही काम पूर्ण नाही. कालच्या पावसात शासन आणि प्रशासन कुठे होते. या सरकारची प्राथमिकता ही पहिल्यापासूनच कंत्राटदार राहिली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे, त्याद्वारे महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू आहे. मात्र मुंबई महापालिकेत १५ सहाय्यक आयुक्त नाहीत, प्रभाग अधिकारी नाहीत. यांचेच लोक सगळीकडे भरले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. आमचे सरकार असताना प्रशासन रस्त्यावर असायचे, ठिकठिकाण पंप लावले जायचे. काल मात्र काहीच दिसत नव्हते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पावसाच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला. पण सामान्यांना जो त्रास झाला त्याचे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत झालेल्या खर्चापेक्षा उत्सवमूर्तींवर खर्च जास्त झाला होता. भाजपने गुजरातमध्ये स्टॅच्यु युनिटी पक्की बांधली. मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला? असा सवाल करत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार आणि दुर्लक्षिततेची चौकशी करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या