Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधदहावीचे शिवधनुष्य पेलताना...

दहावीचे शिवधनुष्य पेलताना…

संसर्गवाढ टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जवळपास सर्वच शाळा ऑनलाईन माध्यमातून चालवल्या जात आहेत. पण इ-अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या पाठ्यघटकांमधील अनेक संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचा वाचनाचा आणि लेखनाचा वेग मंदावला आहे. तशातच आता दहावीच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. हाताशी असलेल्या दिवसांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या झालेली हानी भरून काढण्यासाठी शासन, शाळा, शिक्षक आणि पालक यांनी सर्वसमावेशक आणि व्यापक नियोजन करण्याची गरज आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन कमतरता किंवा अक्षमता निर्माण झाली आहे, समूह किंवा मित्रांचा सहयोग बंद झाल्यामुळे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची फार मोठी हानी झाली आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. दहावी, बारावीच्या तर बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. शैक्षणिकदृष्ट्या झालेली हानी शंभर टक्के भरून काढणे शक्य नसले तरी काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासन, शाळा, शिक्षक आणि पालक यांनी सर्वसमावेशक आणि व्यापक नियोजन करण्याची गरज आहे. आपल्यासमोर हे आव्हान आहे…

* शाळा- सद्यस्थिती : शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजून उपस्थितीचा प्रश्न (समस्या) आहे. काही ठिकाणी त्या एक दिवसाआड याप्रमाणे सुरू आहेत. शिक्षक त्यांचा ‘पोर्शन’ पूर्ण करण्यात गर्क आहेत. मित्रांनो, नुसता पोर्शन पूर्ण करून आता चालणार नाही. त्याबरोबरीने आपल्याला विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक करणे, मनातला न्यूनगंड काढणे, भीती कमी करणे, सतत प्रोत्साहन देणे, लेखनाचा सराव करून घेणे, रोज वाचनाची अनुभूती देणे, नवनव्या अभ्यास स्वयंअध्ययन-स्वयंमूल्यमापनाच्या पद्धती सांगणे, नावीन्यपूर्ण आणि कृतिशील अध्यापन करणे, गृहपाठ देणे, हेही काम आपल्याला करायचे आहे. हे केले तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने पुन्हा उभारी घेतील आणि परीक्षेत यशस्वी होतील. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थाची शैक्षणिक हानी किती झाली आहे याचे सर्वेक्षण आणि वर्गीकरण करून पाठ्यक्रमाची पुढील गटांत विभागणी करावी.

- Advertisement -

1. सेतू अभ्यासक्रम 2) स्वयंअध्यनासाठीचे सोपे घटक 3) ऑनलाईन शिकवण्याचा भाग 4) वर्गात शिकवलाच पाहिजे असा जास्तीत जास्त काठिण्य पातळी असलेला पाठ्यक्रम

याप्रमाणे नियोजन करून कार्यवाही झाली तर बर्‍याच समस्या कमी होतील. पाठ्यक्रमाच्या विभागणीनंतर शाळेच्या (वर्गाच्या) दैनंदिन वेळापत्रकातही आपल्याला काही उपयुक्त बदल करावे लागतील. भाषा विषयाच्या शिक्षकांनी आपल्या सप्ताहातील तासिकांपैकी एक तासिका लेखनाला आणि एक तासिका वाचनाला द्यावी. प्रत्येक विषय शिक्षकांनी वर्गात रोज दहा मिनिटे अनुलेखन (डिक्टेशन) द्यावे तरच विद्यार्थ्यांचे लेखनावर पुन्हा प्रभुत्व निर्माण होईल. असे न केल्यास तुमचा ‘पोर्शन’ पूर्ण होईल, पण मुलांना तो उत्तरपत्रिकेत लिहिता आला नाही तर त्याचा काय उपयोग?

आपण म्हणाल, हे सगळे कसे करणार? शक्य आहे का? वेळ किती देणार आणि कुठून आणणार? खरे आहे. यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन तास शाळा जास्त भरवणे. याला दुसरा पर्याय काहीही नाही. संपूर्ण पिढी घडवायची जबाबदारी आपली आहे. आपण त्यासाठी सक्षम, समर्थ, सबलही आहोत. फक्त आपली मानसिकता हवी.

* विद्यार्थ्यांची जबाबदारी : इयत्ता पहिली ते दहावी या संपूर्ण प्रवासात सोपी परीक्षा दहावीची आहे. फक्त त्याचे स्वरूप (सिस्टिम) विद्यार्थांनी नीट समजून घेतले पाहिजे. मार्च 2022 च्या बोर्ड परीक्षेसाठी शासनाने प्रत्येक विषयाचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यावर कृतिपत्रिकेत (प्रश्नपत्रिकेत) प्रश्न येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी हा कमी केलेला अभ्यासक्रम नीट माहीत करून घ्या. उदाहरणार्थ, भाषा विषयांमध्ये कमी केलेल्या पाठांमधील व्याकरणावर प्रश्न विचारले जाणार आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान भाग 1 व 2 या दोन्ही भागांमधील दाहीच्या दाही प्रकरणे आहेत. फक्त काही चौकटींमधील भाग कमी केला आहे. भूगोलाचे कोणतेही प्रकरण कमी केलेले नाही.

* यशाची सप्तपदी

1) कष्ट, प्रयत्न, अभ्यास, आत्मविश्वास 2) पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व 3) कृतिपत्रिकेचे स्वरूप समजून घेणे 4) लेखनाचा सातत्याने सराव करणे 5) स्वयंअध्यय – स्वयंमूल्यमापन 6) वेळेचे नियोजन 7) योगा, प्राणायाम, ध्यान आणि आहार

* वेळेचे नियोजन : विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करताना झोप ः 7 ते 8 तास, शाळा ः 6 तास, जेवण ः 1 तास, योगा ः 1 तास, रिलॅक्स टाईम ः 2 तास, सकाळचे सर्व विधी ः 1 तास, अभ्यास ः 5 ते 6 तास अशी 24 तासांची विभागणी करायला हवी.

* अभ्यास पद्धती / स्वयंअध्ययन : दहावीच्या उत्तरपत्रिकेत मुद्यांना गुण असतात. प्रत्येक विषयातील मुद्दे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना खिशात मावेल अशी प्रत्येक विषयासाठी छोटी वही करावी. या वहीत फक्त मुद्दे, महत्त्वाचे शब्द, तक्ते, सूत्रे लिहून काढावीत. मोकळा वेळ मिळेल तेव्हा ही वही सतत वाचावी. उत्तरातले सार, पाठ होऊन जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

ब ः स्वाध्याय लिहून काढणे ः बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या कृतिपत्रिकेत (प्रश्नपत्रिकेत) सर्वसाधारणपणे 80 टक्के प्रश्न पाठ्यपुस्तकातील धडा संपल्यानंतर जे स्वाध्याय दिलेले आहेत त्यातले विचारले जातात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वाध्यायासाठी स्वतंत्र वही करावी व त्यामध्ये उत्तरासह स्वाध्याय लिहून काढावेत. यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी तर होईलच, पण त्याबरोबरीने लेखनाचाही सराव होईल. 80 टक्के गुण तर इथेच निश्चित झाले.

क ः आकलनासहीत वाचन : मी खूप वाचतो, पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. प्रत्यक्ष परीक्षेत काही आठवत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी सर्वत्र दिसून येतात. वाचलेले कायमस्वरुपी लक्षात राहिले पाहिजे. वेळेवर आठवले पाहिजे. कोणासही कधीही सांगता आले पाहिजे. यासाठी आपली वाचनपद्धती बदलून ती ‘आकलनासहीत वाचन’ या पद्धतीने करायला हवी. यासाठी प्रत्येक विषयातल्या प्रश्नांना, उपप्रश्नांना संक्षिप्त रूप द्यावे. पाठ्यक्रम, घटक वाचताना महत्त्वाच्या घटकाला अधोरेखित करून त्यावर कोणता प्रश्न येईल हा विचार करावा व त्या प्रश्नाचे संक्षिप्त रूप पुस्तकात लिहावे.

* स्वयंमूल्यमापन ः अ) प्रश्न काढणे ब) मॉडेल अ‍ॅन्सर अभ्यासणे क) स्वतः उत्तरपत्रिका तपासणे. ब) मूल्यमापन प्रक्रिया : दहावीचे मूल्यमापनाचे दोन भाग आहेत. 1) अंतर्गत मूल्यमापन 2) बहिस्थ मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापनात प्रत्येक विषयाला 20 याप्रमाणे सहा विषयांचे मिळून एकूण 120 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापन शाळा घेेते. शाळेत होते, यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत आवश्यक ते सबमिशन आणि शालेय काम वेळेत पूर्ण करावे. गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिके वेळेत पूर्ण करून द्यावीत. पालकांनीही यासाठी सतत शाळेच्या संपर्कात राहावे. बहिस्थ मूल्यमापन म्हणजे 15 मार्चपासून होणारी बोर्डाची लेखी परीक्षा प्रत्येक विषयाला 80 याप्रमाणे सहा विषयांचे मिळून एकूण 480 गुण यासाठी आहेत. अंतर्गत मूल्यमापन 120 गुण-बहिस्थ मूल्यमापन 480 गुण मिळून एकूण 600 गुणांची ही परीक्षा आहे.

डॉ. अ. ल. देशमुख,

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या