दिल्ली l Delhi
सध्या करोनाच्या (Corona Virus) ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (omicron Variant) सर्वांची चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सीरम करोना लस कोवोव्हॅक्स (Covovax) ला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
देशातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, पुणे यांनी कोवोव्हॅक्सच्या पहिल्या बॅचचे उत्पादन आधीच सुरु केले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्वीट करून ही माहिती दिली होती आणि एक नवीन यश प्राप्त केल्याचे सांगितलं होतं. नोव्हावॅक्सने तयार केलेल्या कोविड-19 लसीची पहिली खेप तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्याला कोवाव्हॅक्स नाव देण्यात आले आहे अशी माहिती इन्स्टिट्यूटने दिली होती.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर वापराची मंजुरी मिळणारी कोव्होव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाल्यामुळं आता १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे.