मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपालीकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विकास कामांवरून वाद वाढला आहे. भाजपा, शहर विकास आघाडी व अपक्ष नगरसेवकांनी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
तर काल शहवि व अपक्षांनी भाजपाचे पाच ते सात नगरसेवक आमचच्या संपर्कात असल्याचे खुलेआमपणे सांगीतले, त्यामुळे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले ते नगरसेवक कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच भाजपाने यासंबंधी खुलास द्यावा अशी देखील शहरात चर्चा आहे.
चाळीसगाव नगरपालीकेच्या चार वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत सत्ताधारी शहर विकास आघाडीला शह देत भाजपाने लोकनियुक्त नगराध्यक्ष पद पटकावून पालीकेत जोरदार शिरकाव केला होता. मात्र नगराध्यक्ष भाजपाचा असूनही पालीकेत पुरेसे बहुमत नसल्याने भाजपाने शहर विकास आघाडीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेचे दोन व दोन अपक्ष अशा चार नगरसेवकांच्या जोरावर बहुमत मिळवले होते.
पालीकेत शहर विकास आघाडी १७, भाजपा १३, शिवसेना २ व अपक्ष २ असे बलाबल आहे. मात्र नगराध्यक्षांच्या निर्णायक मतामुळे भाजपा गटाचे पारडे जड होते. मात्र असे असूनही पालीकेत विविध विकास कामांना मंजुरी देण्यावरून सत्ताधारी व विरोधाकंामध्ये कायम ताणाताणी होत राहीली. पुढे या विकास कामांच्या मंजुरीवरून सत्ताधारी गटात धुसफुस वाढली.
सत्ताधारी भाजपाचे दोघा अपक्ष नगरसेवकांबरोबरचे संबंध ताणले गेले. त्यातच दोन दिवसापूर्वी उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण व अपक्ष नगरसेविका सायली जाधव तसेच शहर विकास आघाडीच्या व पालीका प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे शहरातील विकासकामे खोळंबल्याचा आरोप सत्ताधारी भाजपकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. त्यावरून पालिकेत वाद आणखीच ऊफाळून आला.
त्यानंतर शहर विकास आघाडीचे नगरसेवक व अपक्ष नगरसेविकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेत भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण ह्या नगर परिषद व शहरवासीयांप्रती असलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरल्या असून त्यांना नगराध्यक्ष पदावरून हटवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्यात बुधवारी अपक्षांनी आम्ही भाजपा सोबत नसून यापुढे आपण शविआ सोबत असल्याचे उपनगराध्यक्षा व अपक्ष नगरसेविका आशाबाई चव्हाण व सायली जाधव यांनी पत्रपरिषदेत सांगितते.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या कारभारला कंटाळून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असुन भाजपचे नाराज पाच ते सात नगसेवकही आघाडी सोबत असल्याचा दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यामुळे आता शहवि आघाडी व अपक्षांच्या संपर्कात असलेले पाच ते सात भाजपाचे नगरसेवक कोण ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला असून भाजपाने त्यावर जाहिररित्या खुलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
यात भाजपाचे ‘ जेष्ठ नगरसेवक ’ हि आमच्या संपर्कात असल्याचे सूचक वक्तव्य शहवि आघाडी उपनेते सुरेश स्वार यांनी केले होते. त्यामुळे ते जेष्ठ नगरसेवक कोण? असा सवाल उपस्थित केला जात असून गेली चार वर्ष भाजपात राहुन सत्तेची फळे चाखणारी, व आता आर्थिक फायद्यासाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खोपसारे कोण अशी चर्चा शहारात आहे. तर नुकत्याच शहवि आघाडीच्या एका नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर पार्टीस वजा बैठकीसाठी भाजपाचे काही नगरसेवक देखील गेल्याची चर्चा शहरभर आहे. त्यामुळे भाजपामधील असे ‘ फुटीरवादी ’ कोण ? याचा शोध घेणे देखील भाजपाच्या पदाधिकार्यांसाठी गरजेचे आहे. या सर्व घडामोडींना सत्ताधारी भाजपा कसे सामोरे जाते याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे. यामुळे मात्र भाजपात अंतर्गत दुफळी निर्माण झाली असून लवकर यांचा राजकिय विस्फोट होण्याची चिन्ह दिसत आहेत.