Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधकोण ठरवतो, थंडी आणि पाऊस?

कोण ठरवतो, थंडी आणि पाऊस?

थंडी कशी पडते? थंडी का वाजते? थंडीकडे जो तो आपापल्या नजरेने बघतो. युवा पिढीला थंडी गुलाबी भासते तर काहींना मात्र हुडहुडी भरते. याच ऋतूत रब्बीची पिके हाताशी येतील अशी स्वप्ने शेतकर्‍याला पडतात. कवींना कविता स्फुरतात. थंडीत काहींचे मन लहानपणात फिरून येते. काहींना मात्र वाढत्या थंडीमुळे अनारोग्याची भीती वाटते. अंदाज केवळ ‘अंदाज’ ठरू नयेत, अशी हवामानतज्ज्ञांची मनीषा असते. थंडीचा असा ज्याच्या त्याच्या नजरेतून वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे, ‘ऋतू गारवा’..

माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

खरे तर एकदा महाराष्ट्रातून परतीचा पाऊस निघून गेल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेनंतर केवळ फक्त हळूहळू थंडी वाढत जावी हीच अपेक्षा असते. परंतु आपण दिवाळी, कार्तिक एकादशी,

- Advertisement -

त्रिपुरारी पौर्णिमा, चंपाषष्ठी, दत्तजयंती तर कधी-कधी नाताळपर्यंतही पाऊस झाल्याचे अनुभवले आहे, आजही अनुभवत आहे.

कुठला हा पाऊस?

त्याची कारणे व उगमस्रोत काय?

हवामानशास्त्रीय याचा आधार काय?

तसेच त्याचे महाराष्ट्रातील रब्बी हंगामावर होणारे बरे-वाईट परिणाम काय?

खरे तर हेच हवामान साक्षरतेच्या दृष्टीने जाणून घेणे फार गरजेचे आहे. महाराष्ट्रात हिवाळ्यात क्वचित येणारा, शेतकर्‍यांच्या ओळखीचा असणारा, त्यांच्या तोंडून नेहमी त्याकाळात अवकाळी, बेमोसमी म्हणून ऐकलेला हा पाऊस.

अगोदर चक्रीवादळे व नंतर पावसावर येऊया.

देशात दोन प्रकारची चक्रीवादळे असतात. पण आपणास फक्त बंगाल व अरबी समुद्रावरून येणारेच परिचित आहे.

एक-

एक युक्रेन, तुर्कस्थानजवळील भूमध्य व काळा समुद्रात उगम पावून प्रचंड आर्द्रता घेऊन अफगाणिस्तान, पाकिस्तानातून प्रवास करणारे, अत्युच्च हिमालयाशिवाय त्यांना अटकाव करणारा कोणीच नसल्यामुळे केवळ उत्तरेतील अर्ध भारतात जमिनीवर झंझावाताच्या रूपात मार्गक्रमण करणारे जमिनीवरची चक्रीवादळे. ज्याला आपण हवामानशास्त्रीय भाषेत ‘वेस्टर्न डिस्टर्बनसेस’ किंवा मराठीत ‘पश्चिमी झंझावात’ म्हणतात.

तर दुसरे –

विषुववृत्ताच्या थोडे उत्तरेकडे (0 ते 1 डिग्रीदरम्यान) भारतीय महासागरात अंदमानाच्या आग्नेय भागात उगम व विकसित झालेले चक्रीवादळ. सिझन वार्‍याच्या निसर्गनियमनुसार सरळ

पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्त समांतर दक्षिण आफ्रिकेतील सोमालिया, केनिया, युगांडा दिशेकडे अपेक्षित असते. पण पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यामुळे तयार झालेला वार्‍याचा ‘कोरिओलीस फोर्स’ परिणामातून उजवीकडे म्हणजेच भारताच्या तामिळनाडू किनारपट्टीकडे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान फेकली जातात. (हा कोरिऑलिस इफेक्ट फ्रेंच गणितीतज्ज्ञ मिस्टर ‘गॅसपर्ड गुस्तावा डी कोरिऑलिस’ याने 18 व्या शतकात शोधून काढला आहे.)

यापैकी वरील प्रकार (एक) मधील झंझावात उत्तर भारतात साधारण सात-आठ महिने बर्फ, पाऊस, थंडी, धुके देत चालतात व त्याचबरोबर महाराष्ट्रात हिवाळ्यात थंडी पाठवतात. आपल्याकडील हिवाळा व चांगली थंडी केवळ याच पश्चिमी झंझावातावर अवलंबून आहे.

प्रकार (दोन) मधील चक्रीवादळे ही दक्षिण भारतातील चार जिल्ह्यांत अतिजोरदार कोसळणारा हंगामी ईशान्य मोसमी पाऊस देतात. तर कधी रस्ता चुकल्यानंतर महाराष्ट्रातही बेमोसमी हिवाळी पाऊस देतात व उत्तरेकडील झंझावाताने महाराष्ट्राला पाठवलेली थंडीही खाऊन टाकतात. त्यामुळे वातावरण निवळेपर्यंत रब्बी पीक हंगामाचा बट्याबोळ करतात. आताही काल-परवाचा महाराष्ट्रातील पाऊस याच प्रकारातून आला व त्याने महाराष्ट्रातील सध्याची अतिपडणारी थंडीही खाऊन टाकली.

चक्रीवादळाचा ऑक्टोबर ते डिसेंबर हा तीन महिन्यांचा कालावधी असला तरी त्यातही तीव्र चक्रीवादळाचा सरासरी काळ हा खरेतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत अशा 45 ते 50 दिवसांचा असतो. परंतु यानंतरही डिसेंबरअखेरपर्यंत एखाद दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात घडून येतातच.

पण ज्यावेळेस परतीचा मान्सून हा जर वेळेतच म्हणजे 15 ऑक्टोबरच्या आत परतला आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये तामिळनाडू आणि इतर तीन राज्यांत ईशान्य मान्सून सक्रिय राहिला तर महाराष्ट्रातील पुढील पाच महिन्यांच्या कालावधीतील रब्बी हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. म्हणजेच रब्बी हंगाम पिकांसाठी अनुकूल व चांगल्या लाभदायी वातावरणाचा ठरतो. याचाच अर्थ महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात चांगली हंगामी पिके येण्यासाठी नकळत नैऋक्त मान्सून वेळेत लवकर परत जाणे व या अशा थोडा रस्ता चुकलेल्या चक्रीवादळाशी संबंधित आहे, असेच समजावे.

कसा परिणाम करतात ही चक्रीवादळे ?

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील भारतीय उत्तर समुद्रात पंधरा डिग्री उत्तर अक्षवृत्तादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र या कालावधीत तयार होऊन विषुववृत्ताच्या समांतर समुद्रसपाटीदरम्यान पूर्वेकडून पश्चिमकडे कवाली व ओंगोल या दोन शहरांदरम्यान ते तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आदळतात. त्या ठिकाणी तीन महिने भरपूर पाऊस देतात. कधी तर तामिळनाडू पास करून दक्षिण द्विपकल्प ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करतात. म्हणजेच चक्रीवादळाचे सुरुवातीचे अगोदरील एक-दोन पायर्‍यातील उलट गणतीतून उतरत्या कळाकडे झुकत आलेले हे शिल्लक अवशेषीय वातावरणीय कमी दाबाचे क्षेत्र जेव्हा अरबी समुद्रात उतरते तेव्हा पुन्हा पेट घेते म्हणजेच पुन्हा त्याची ऊर्जितवस्था सुरू होते. समुद्रात एन्ट्री झाल्यामुळे त्याचे रूपांतर होऊन उत्तरेकडे मार्गस्थ होऊन कधी कोकण व मध्य महाराष्ट्रात घुसते व तेथे पाऊस देऊन जाते. त्यालाच आपण बेमोसमी, अवकाळी, हिवाळी पाऊस म्हणतो.

परंतु जर हे निसर्गचक्र बिघडले म्हणजे परतीचा मान्सून उशिरा गेला तर कदाचित काही वेळेस हेच कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात अधिक उत्तरेकडे म्हणजे साधारण पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र किनारपट्टीदरम्यान तयार होऊ लागतात. त्यामुळे ईशान्य मान्सून म्हणजेच हिवाळी पाऊस तामिळनाडू राज्यात कमी होतो आणि आपल्याकडे मात्र त्याचवेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हीच चक्रीवादळे बंगालच्या उपसागराकडून वायव्येच्या दिशेने आगेकूच करून दक्षिण छत्तीसगड, विदर्भातून मध्य प्रदेशकडे झेपावतात व महाराष्ट्राला अवकाळी पाऊस देऊन जातात. आपल्याकडे त्याचवेळेस कांदा, गहू, हरभरा, भाजीपाल्याची पिके असतात. काहीवेळेस पिकांना फायदा तर काही पिकांना हा पाऊस नुकसानदायी ठरतो. पाऊस झाला तर ठीक नाहीतर संपूर्ण डिसेंबर महिन्यात आकाश नेहमी ढगांनी आच्छादित राहून अपेक्षित असलेली थंडी पळवून लावली जाते व रब्बी पिकांना मार बसतो.

आपल्याला फायद्या-तोट्याचा पाऊस मिळाला तरी तामिळनाडूमध्ये मात्र याचा परिणाम होऊन तेथे पावसाचे प्रमाण कमी होते. तेथील भातासारख्या पिकांना पावसाअभावी मार बसतो. विशेषत: ज्यावर्षी ‘ला निना’ सक्रिय असतो व ‘भारतीय महासागरीय द्वीध्रुवीता’ तटस्थ किंवा सकारात्मक असते त्यावेळेस तामिळनाडूतील ईशान्य मान्सून विस्कळीत होतो. मात्र कदाचित अशा अवस्थेत चांगला तर कधी नुकसानदायी पाऊस पडतो. अशीच अवस्था यावर्षी 2022 ला होती; परंतु तरीदेखील असे काही घडून आले नाही. म्हणजेच अशा ठोकताळ्याला कधी कधी निसर्ग विसंगती घडवून आणतो.

शेवटी एकंदरीत वेस्टर्न डिस्टर्बनसेस व चक्रीवादळेच महाराष्ट्रातील हिवाळ्यातील रब्बी हंगाम व थंडीचे भवितव्य ठरवतात.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या