अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यात साखर आयुक्तपदावर बदली झालेले जिल्हाधिकारी सिध्दाम सालीमठ यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे सोपवला. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सालीमठ यांचा निरोप समारंभ पार पडला. दरम्यान, नगरचे नवे जिल्हाधिकारी कोण? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. दोन वर्षापूर्वी जिल्हाधिकारी पदाची सुत्रे सालीमठ यांनी घेतली होती. 14 फेबु्रवारीला त्यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. अजून किमान एक वर्षे सालीमठ नगरला काढतील, असा अंदाज असतानाच अचानक त्यांच्या पुण्यात साखर आयुक्त पदावर बदली झाल्याचे आदेश मुंबईतून निघाले.
या आदेशानंतरही सुमारे दहा दिवस सालीमठ नगरला कार्यरत होते. आता बदली रद्द होणार असा सर्वाचा समज असताना सोमवारी सालीमठ यांनी पदाचा कार्यभार शिर्डीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांच्याकडे सोपवला. दरम्यान, सालीमठ यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी रात्रीपर्यंत आदेश निघाले नव्हते. आधी यवतामाळ याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिय यांच्यासह अन्य नावाची चर्चा होती. त्यात सोमवारी आणखी काही नावाची भर पडली असून यामुळे भाजप सरकार आता नगरला जिल्हाधिकारी म्हणून कोणाला पाठवणार यासह जिल्ह्यातील आणखी कोणाकोणाच्या बदल्या होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.