Monday, November 25, 2024
Homeब्लॉगकोण होणार मुख्यमंत्री?

कोण होणार मुख्यमंत्री?

राज्याच्या विद्यमान विधानसभेची मुदत संपायला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. भाजपच्या पाठबळावर महायुतीचे सरकार सध्या राज्याचा कारभार पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुहेरी नेतृत्वात ‘जनतेच्या मनातील सरकार’ वेगाने धावत आहे. तरीही ‘भावी मुख्यमंत्री’, ‘मनातील मुख्यमंत्री’ अशी विशेषणे देऊन अनेक नावांची चर्चा वेगवेगळ्या नेत्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चांचे पेव का फुटले? ते जनतेलाही कळेनासे झाले आहे…

महाराष्ट्राचा स्थापना दिवस (महाराष्ट्रदिन) दोन दिवसांवर आला आहे. राज्याच्या 63 व्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?’ या मुद्यावर चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले आहे. काही नावे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून तर काही नावे ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ म्हणून त्या-त्या नेत्यांच्या समर्थकांकडून अभिमानाने चर्चिली जात आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांनी राज्यातील जनतेचे कुतूहल वाढले आहे. राज्याच्या विद्यमान विधानसभेची मुदत संपायला अद्याप दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. भाजपच्या पाठबळावर महायुतीचे सरकार राज्यकारभार पाहत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुहेरी नेतृत्वात ‘जनतेच्या मनातील सरकार’ वेगाने धावत आहे. तरीही नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चांचे पेव का फुटले? ते जनतेलाही कळेनासे झाले आहे.

- Advertisement -

गेल्यावर्षी शिवसेना फुटीतून राज्यात सत्तांतर घडले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. एप्रिल महिना संपण्याच्या बेतात असताना सरकार 10 महिन्यांचे झाले आहे. बहुमताचे मोठे संख्याबळ सरकारच्या पाठीशी आहे, पण सरकार स्थापनेनंतर राज्याचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाले आहेत.

त्यावरचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. निकालाची तारीख निश्चित नसली तरी तो 14 मेच्या आत लागेल, अशी अटकळ राजकीय जाणकारांनी बांधली आहे. बहुमत असूनही सरकारवर अनिश्चिततेची टांगती तलवार लटकत आहे. 16 आमदार अपात्र ठरतील, त्या आमदारांत एकनाथ शिंदेही असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे मत बहुतेक विधिज्ञांनी व्यक्त केले आहे.

त्या संभाव्य निकालाबाबत सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल वाढल्याच्या चर्चा माध्यमांत आणि राजकीय वर्तुळातही सुरू आहेत. अशा संभ्रमित वातावरणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच ‘नो पेन्डन्सी…’ अशा ओळी लिहून फायलींचा निपटारा करतानाचे सूचक छायाचित्र ‘ट्विट’ केले. मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याने ते सुटीवर गेल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र ‘आपण सुटीवर नसून डबल ड्युटीवर आहोत’ असे सांगून शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. तीन दिवसांत आपण अनेक फायलींचा निपटारा केल्याचे त्यांनी सांगितले. फायली हातावेगळ्या करण्याची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची लगबग पाहता ‘कुछ तो गडबड है’ असे लोकांना वाटू शकते.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असे काही राजकीय जाणकार सांगत असले तरी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना मात्र तसे वाटत नाही. त्याबाबत त्यांनी व्यक्त केलेली मते आणि भाकिते चकित करणारी आहेत. सत्ताधार्‍यांना गाफिल ठेवण्यासाठी अशी भाकिते केली जात आहेत का? अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत. 16 आमदार अपात्र ठरले तरी सरकारकडे पुरेसे बहुमत असल्याने सरकार कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील अजितदादांच्या मताशी मिळते-जुळते मतप्रदर्शन केले. पवार-भुजबळ यांच्या वक्तव्यांमुळे सत्ताधारीही आवाक झाले असतील.

दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या आणि 40 आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले. राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का? यावरही खल सुरू झाला. 16 आमदार अपात्र ठरले तर एकनाथ शिंदे यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा पर्याय भाजपकडून चाचपडला जात असल्याच्या वावड्या उठल्या वा उठवल्या गेल्या. मुख्यमंत्री होण्याचे पवार यांचे स्वप्न नजीकच्या काळात साकार होऊ शकते या कल्पनेने दादा समर्थक आनंदले असतील.

पुणे, मुंबईपाठोपाठ नागपुरातही अजितदादांचे ‘भावी मुख्यमंत्री’, ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे होर्डिंग कार्यकर्त्यांनी झळकवले. या चर्चांदरम्यान एका प्रकट मुलाखतीत अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ असे सांगून आपली महत्त्वाकांक्षा सर्वांसमोर आणली. अजित पवार भाजपसोबत आल्यास त्यांचे स्वागतच आहे, अशी वक्तव्ये करून काही मुरब्बी भाजप नेत्यांनी अजितदादांबाबतच्या चर्चांना हवा देऊन अचूक वेळ साधली. भाजप नेत्यांची ती व्यक्तव्ये शिंदे गटाची घालमेल वाढवणारी आहेत.

सध्या शिंदे मुख्यमंत्रिपद भूषवत असले तरी फडणवीस हेच आमच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ असल्याचे भाजपचे काही नेते आणि फडणवीस समर्थक सांगत आहेत. तसे होर्डिंगही नागपूर आणि इतरत्र झळकत आहेत. अंधेरी, कसबा पेठ पोटनिवडणुका, शिक्षक-पदवीधर निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भाजपला वरचढ ठरली.

आजतरी सत्ताधारी महायुतीपेक्षा आघाडी मजबूत वाटते. तथापि विविध मुद्यांवरून आघाडीत मतभेद निर्माण होत आहेत. आघाडीत फूट पडल्यास आपले काम सोपे होईल, असे सत्ताधारी पक्षांना वाटत असावे. नजीकच्या काळात आघाडीतील काही आमदार फुटून भाजप अथवा शिंदे गटात येतील, अशी भाकिते करून आघाडीवर दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू असावेत. त्या दबावाला आघाडीचे नेते बळी पडून प्रतिक्रिया देत असल्याने आघाडीतील पक्षांत संभ्रम निर्माण होऊ शकतो.

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका कार्यक्रमात ‘जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहायला आवडेल’ असे मनोगत व्यक्त केले. कोल्हे यांचे विधान राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भुवया उंचावणारे आहे. काही महिन्यांपूर्वी राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभावी, अशा सदिच्छा प्रकट करून काही नावांचाही उल्लेख करण्यात आला होता. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बाळगणार्‍या त्यांच्या चाहत्यांचा मात्र त्या घोषणेने हिरमोड झाला असेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या