Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखप्रगतपणाचा वारसा कोण जपणार?

प्रगतपणाचा वारसा कोण जपणार?

महाराष्ट्र राज्य ही समाजसुधारकांची आणि संतांची भूमी आहे. देशातील आघाडीचे विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी आणि जुनाट परंपरा यांच्यावर संत आणि समाजसुधारकांनी सतत कठोर प्रहार केले.

लोकांनी शिक्षणाची कास धरावी यासाठी कष्ट केले. या सर्वांच्या प्रयत्नांनी अनेक सुधारणा झाल्या. विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाह या दोन कायद्यांची शतकपूर्ती याच महाराष्ट्र राज्याने नुकतीच साजरी केली. ज्या काळात अशा विवाहांचा नुसता उच्चार करणे म्हणजे समाजाच्या रोषाला सामोरे जाणे होते. त्या काळात असे कायदे करण्याचे अतुलनीय धाडस राजर्षी शाहू महाराजांसारख्या अनेक समाजसुधारकांनी दाखवले होते.

- Advertisement -

महाराष्ट्राला किती प्रगत आणि काळाच्याही पुढे पाहणार्‍या विचारांचा वारसा लाभला आहे याचे हे एक उदाहरण आहे. हा वारसा जपण्याऐवजी त्याला काळिमा फासण्याचे प्रसंग अलीकडच्या काळात वारंवार घडत आहेत. जातिबाह्य विवाह केला म्हणून जातपंचायतींनी सामाजिक बहिष्कार घातल्याचा घटना अधूनमधून घडत असतात. काही प्रकरणे उघडकीला येतात. काहीवेळा कायदेशीर कारवाई देखील होते. तथापि भावकीत किंवा भाऊबंदांमध्ये विवाह केला म्हणून देखील गाव बहिष्कार टाकते हा नवीनच प्रकार समोर आला आहे.

ही घटना रत्नागिरीतील देवरुख येथे घडली. येथील एका युवकाचे भावकीतील एका मुलीवर प्रेम होते. त्यांनी विवाह करायचे ठरवले. या विवाहाला नातेवाईकांनी विरोध केला. पण युवक-युवतीने विरोधाला न जुमानता लग्न केला. परिणामी गावाने युवकाच्या कुटुंबावर बहिष्कार घातला. दुसरी घटना पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील! येथील टाकावे ग्रामपंचायतीतील तीन सदस्यांची नावे असलेली लिंबे झाडाला ठोकलेली आढळली. तिसरी घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान एका गावातील दोन-तीन विहिरींमध्ये तांदूळ आणि गुलाल भरून टाकण्यात आल्याची चर्चा होती. एका बाजूला प्रगत महाराष्टाची हमी द्यायची, प्रगतपणाचा आणि पुढारलेपणाचा अभिमान मिरवायचा आणि दुसर्‍या बाजूला मात्र जादूटोणा, सामाजिक बहिष्कार असे उद्योग चालू ठेवायचे किंवा घडू द्यायचे. अशा प्रसंगांना विरोध न करता चुप्पी साधायची. ‘मला काय त्याचे’ अशी सोयीस्कर भूमिका घ्यायची. असे अजून किती काळ सुरु राहणार आहे?

गेल्या 5-7 वर्षात अशी प्रकरणे वेगाने वाढत आहेत. यामागे फक्त सामाजिकच कारणे असतील का? राजरोस सामाजिक बहिष्कारासारखी व जादूटोण्याची प्रकरणे घडत असतांना समाजहितैषी, समाजशास्त्रज्ञ आणि कायदयाचे रक्षक काय करत आहेत? समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? टाळेबंदीच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी चांगले काम केले. अशा संस्थांनीही सामाजिक जागृतीसाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजात अंधश्रद्धांचे प्रकार घडत असतांना समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजायला हवा अशी अपेक्षा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली आहे. ते नाशिक येथे मार्च महिन्यात होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचा प्रगतपणाचा वारसा जपला जाण्यासाठी जनतेत विज्ञानवादी दृष्टिकोन रुजणे गरजेचेच आहे. समाजाला योग्य मार्ग दाखवणे आणि त्यासाठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा देखील उपयोग करणे ही साहित्यिकांची देखील जबाबदारी आहे. सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज आहे. याचे भान संबंधितांना येईल का? अन्यथा समाजाची अवस्था संत एकनाथ महाराजांनी एका भारुडात म्हटल्याप्रमाणे ’या लोकांशी येड लागले..या जनांशी येड लागले’ अशीच होत राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या