नाशिक । प्रतिनिधी Nashik
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत ( Shivsena ) फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार देखील संकटात सापडली आहे. त्याचा परिणाम नाशिक शहरातील महापालिकेच्या राजकारणात देखील होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ( Upcoming NMC Elections ) सत्ता कोणाची येणार याबाबत आणखी चुरस निर्माण झाली आहे.
मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये शिवसेना पक्षामध्ये दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच फलकबाजीने देखील जोर घेतला आहे. काही जण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फलकबाजी करीत आहे, तर काही लोक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांच्या बाजूने फलकबाजी करताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन पैकी एक आमदार यापूर्वीच शिंदे गटात सामील झाल्याचे टीव्हीवर दिसले होते तर दुसरे आमदार देखील त्यांना जाऊन भेटल्याचे बातम्या पसरत आहे.
दरम्यान नाशिक महापालिका निवडणूक कधीही होण्याची शक्यता आहे तर गत दोन वर्षापासून नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार असा दावा करीत शिवसेना पक्षाने महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौरे करून शिवसेनेचे जुन्या नेत्यांना परत शिवसेनेत आणून कोर कमिटी स्थापन केली होती. त्याप्रमाणे सत्ता असल्यामुळे शिवसेनेने चांगल्या पद्धतीने प्रभाग रचना करून घेतली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठे भूकंप झाल्यामुळे त्याचा फटका नाशिक महापालिका तसेच शहराच्या राजकारणावर देखील पडणार आहे हे मात्र नक्की झाले आहे.
सध्या तरी नाशिक शहरातील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी मातोश्रीचे निष्ठावंत असल्याचे दिसत आहे. मात्र हळूहळू वातावरण बदलत आहे, त्याचा परिणाम स्थानिक पातळीवर काय होतो हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार चांगले चालू होते. यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत देखील हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार हे जवळपास निश्चित झाले होते. 2012 ते 17 या काळामध्ये नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक हाती सत्ता होती. तर 2017 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 66 नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण बदलले होते तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महापालिकेत निवडून गेले होते.
महाविकास आघाडी राहणार का?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नाशिक महापालिकेतील सत्तांतर होणार असा दावा शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केला होता, मात्र राज्यातील घडामोडी बघता महाविकास आघाडीचे सरकार किती दिवस राहणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सोडला आहे. यामुळे जर राज्यात महाविकास आघाडी सरकार राहिले नाही तर नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार का हा प्रश्न चर्चिला जात आहे. यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाचा फटका नाशिक देखील होणार आहे.