दुबई – Dubai
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज सलामीच्या सामन्यात एकमेकांसमोर उभे टाकतील. हा सामना कोण जिंकणार? यांची उत्सुकता तमाम क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
अशात सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जवर वरचढ ठरेल, अशी भविष्यवाणी भारतीय संघाच्या माजी सलामीवीर गौतम गंभीरने केली आहे.
गंभीर म्हणाला, चेन्नईच्या संघात सुरेश रैनाचीही अनुपस्थिती चिंतेचा विषय असेल, तसेच मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांचा सामना करणे, चेन्नई सुपर किंग्जसाठी कठीण असेल. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईच्या संघावर वरचढ ठरेल.
दरम्यान, आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्जची डोकेदुखी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. चेन्नईचा कोरोनाबाधित मराठमोळा खेळाडू ॠतुराज गायकवाड पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी याची माहिती दिली.
काशी विश्वनाथन म्हणाले, की ॠतुराज गायकवाड पूर्णपणे ठीक आहे, पण संघात सामील होण्यास अद्याप त्याला बीसीसीआयची मंजुरी मिळाली नाही.
ॠतुराजला अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे हिरवा कंदील मिळालेला नाही. तो क्वारंटाइनमध्ये आहे. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता नाही. आम्ही येत्या काही दिवसात तो पुनरागमन करण्याची अपेक्षा करत आहोत.