Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखजबाबदार युवा पिढीचे निर्माण, हि कोणाची जबाबदारी?

जबाबदार युवा पिढीचे निर्माण, हि कोणाची जबाबदारी?

बेरोजगारी वाढत आहे. राज्यात साडेचार हजारांपेक्षा जास्त पदांसाठी तलाठी भरतीची प्रक्रिया सुरु होती. या जागांसाठी साडेबारा लाखांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले. यामुळे शासनाला या पदांच्या परीक्षेसाठी फेरनियोजन करावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित युवकांचा समावेश आहे. हे फक्त बेरोजगारीचे विदारक चित्र आहे असे म्हणणे योग्य ठरू शकेल का? ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ नुसार देशातील बेरोजगारीचा दर वाढत आहे.

उच्चशिक्षित युवक नोकऱ्यांच्या शोधात आहेत हे वास्तव आहे. काही हजार पदांसाठी लाखो अर्ज दाखल होण्यामागे रोजगाराच्या अपुऱ्या संधी हे एक कारण आहेच. तथापि युवा पिढीत शासकीय नोकरीचे वाढते आकर्षण हे देखील एक कारण असावे का? शासकीय नोकरी लागली म्हणजे फक्त काही वर्षांचीच नव्हे तर निवृत्तीनंतरची देखील सोय झाली अशी लोकांची भावना आहे. शासकीय नोकरीच्या लाभांचे आकर्षण कोणाला नसेल? नोकरीची हमी, अत्यंत माफक दरात उपलब्ध होणारी उच्च दर्जाची आरोग्य सुविधा, पर्यटन, वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार बदलत जाणारे वेतन आणि निवृत्तीवेतन हे शासकीय नोकरीचे काही लाभ. कदाचित यामुळेच शासकीय भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच लाखोंनी अर्जाचा ढीग त्यात होतो. तलाठी भरतीच्या बाबतीतहीही तोच अनुभव समाजाला आला आहे. जागा चतुर्थ श्रेणीची असली तरी उच्च शिक्षित माणसेही अर्ज करताना आढळतात. इच्छुक उमेदवार मध्यस्थाची शोधाशोध करतात. काही महाभाग पैसेही देऊन बसतात. अशा बेकायदा व्यवहाराचा फटका अनेकांना बसल्याचा इतिहास आहे. तथापि सरकारी नोकरीचे आकर्षणच इतके दांडगे की आर्थिक व्यवहार मागच्या पानावरुन पुढे सुरूच राहातो. या सगळ्या गदारोळात युवा पिढीला सामाजिक दायित्वाचा विसर पडत असावा का? सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तरे शोधण्याची जबाबदारी युवांची आहे याची आठवण जाणते सातत्याने करून देतात. जाणत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या युवांची संख्या हळूहळू वाढत आहे ही समाजासाठी समाधानाची बाब आहे. दूरचित्रवाहिन्यांवर तरुणांमधील सर्जनशीलतेला, संशोधक वृत्तीला प्रेरणा देऊन आर्थिक पाठबळ देखील देणारे अनेक कार्यक्रम चालतात. त्यात अनेक युवा चमकदार कामगिरी करतात. ‘न्यू पाथवेज’ नावाच्या पुस्तकात नाविन्यपूर्ण संशोधनाच्या अंमलबजावणीच्या यशोगाथा वाचायला मिळतात. ज्याचे प्रकाशन खुद्द पंतप्रधानांनी केले आहे. समाजाला अनेकानेक समस्या भेडसावतात. त्या सोडवणे हे सरकारचे कर्तव्य आहेच. तथापि सरकारवर अवलंबून राहणे अनेकदा फक्त कालापव्यय करणारे ठरू शकते. सामाजिक समस्यांकडे बघण्याचा संवेदनशील दृष्टिकोन युवा पिढीत विकसित व्हायला हवा. समाज बदलण्यासाठी स्वतःत बदल करणे अपरिहार्य आहे याची जाणीव रुजायला हवी. संपन्न सामाजिक जीवन निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी आहे याचे भान यायला हवे. समाजाच्या सुदैवाने डॉ.अभय आणि राणी बंग यांची ‘निर्माण’ संस्था, डॉ.रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांच्यासारखी कार्यप्रवण माणसे आणि अशाच अनेक सामाजिक संस्था तरुण पिढीत मानसिक परिवर्तन घडावे यासाठी काम करतात. युवा पिढीत एकदा का सकारात्मक सामाजिक दृष्टीकोन आणि संवेदनशीलता विकसित झाली तर त्यांना सामाजिक परिस्थितीचे आकलन होऊ शकते. केवळ लोकांच्याच नव्हे तर पशुधनाच्या, भटक्या जनावरांच्या देखील समस्या जाणवू शकतात. त्यावर उत्तर शोधण्याची प्रेरणा त्यांच्या जागी होते. अशा जबाबदार युवांची संख्या वाढणे हे देखील बरोजगारीवरचे उत्तर ठरू शकेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या