दिल्ली | Delhi
न्यायालयात कामकाज सुरू असताना एका शिस्तीत हे काम सुरू असते. तिथे काही संकेत पाळावे लागतात, शिष्टाचार पाळावा लागतो. मात्र काहीवेळी वकिलांकडून मर्यादा ओलांडली जाते, शिष्टाचार पाळले जात नाहीत.
मात्र न्यायाधीश अशा गोष्टींना वेळीच निदर्शनास आणून त्याचे पावित्र्य आणि महत्त्व कायम ठेवण्याचे काम करतात. असा एक प्रसंग नुकताच घडला असून भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एका प्रकरणावरील सुनावणीदरम्यान वकिलांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. हे कोर्ट आहे, कोणते कॉफी शॉप नाही. मी सहन करणार नाही, असे म्हणत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्या वकिलाला झापले.
सुप्रीम कोर्टात याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे वकील सतत मान डोलावून Yeah, Yeah, Yeah (याह) म्हणत होते. त्यावर सरन्यायाधीश त्या वकिलास म्हणाले, Yeah, Yeah, Yeah म्हणण्यापेक्षा ‘Yes, Yes, Yes’ (येस) म्हणा. सरन्यायाधीशांनी ऐकवल्यानंतर त्यांनी माफी मागितली व त्यांचा मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा एकदा हे वकील बोलताना अडखळले. तसेच त्यांनी पुन्हा एकदा Yeah चा उच्चार केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना पुन्हा एकदा Yeah ऐवजी Yes म्हणण्यास सांगितले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, हे काही कॉफी शॉप नाही, मला तुमच्या या ‘Yeah, Yeah, Yeah’ ची अॅलर्जी आहे. न्यायालयात अशा व्यवहाराची अनुमती देता येणार नाही. सरन्यायाधीश संतापल्याचे पाहून वकिलांनी नम्रपणे त्यांना सांगितले की, ‘आपण महाराष्ट्रातील आहोत. त्यामुळे असे बोलून गेलो.’ त्यानंतर मग सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना मराठीतून समजून सांगितले.
दरम्यान याचिकाकर्त्या वकिलाने २०१८ मध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्या वकिलाने गोगोई यांच्याविरोधात चौकशीची मागणी करत होते, जे आता राज्यसभा खासदार आहेत. वकिलाने आपल्या कायदेशीर भूमिकेचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि माजी रंजन गोगोई यांच्या निकालांचा हवाला दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांना न्यायाधीशांवर अशा प्रकारे आरोप करण्यास मनाई केली आणि त्यांना याचिकेतून न्यायमूर्ती गोगोई यांचे नाव काढून टाकण्याचे निर्देश दिले.