मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदारांनी पवारांची भेट घेतली.
या आमदारांनी तासभर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. सलग दुसऱ्या दिवशी अजितदादा गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. काल काही आमदारांना शरद पवार यांचं दर्शन घेता आलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आज घेऊन आलो, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसंच पुन्हा एकदा पक्ष एकसंघ राहावा यासाठी योग्य विचार करा अशी विनंती केल्याचं सांगितलं.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, काल फक्त मंत्री भेटीसाठी आले होते. अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी, भेटण्यासाठी आलो होतो. काल रविवार असल्याने आमदार आपापल्या मतदारसंघात होते. आज विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्याने बऱ्यापेकी आमदार हजर होते. त्यामुळे सर्व आमदार शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी दाखल झालो होतो. सर्वांनी आशीर्वाद घेतला आणि आज पुन्हा एकदा पक्ष एकसंघ राहावा यासाठी विचार करा अशी विनंती केली. शरद पवारांनी म्हणणं ऐकून घेतलं आहे. पण त्यांच्या मनात काय आहे याची मला माहिती नाही. काल जसं म्हटलं होतं तशीच विनंती आज करुन पक्ष एकसंध राहावा, यासाठी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवार काय बोलले, हे मात्र अस्पष्ट आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या गटातील आमदारांची बैठक खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरु आहे. त्यानंतर शरद पवार भूमिका स्पष्ट करतात की आजही मौनच बाळगतात, हे बघावं लागेल.