नाशिक | फारूक पठाण
राज्यात जानेवारी 2023 ते मे 2023 या पाच महिन्यांच्या कालावधीत 5 हजार 610 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज सरासरी 70 महिला बेपत्ता होत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केली व या भयानक घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. यापूर्वी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या 2016-17 आणि 2018 च्या अहवालानुसार बेपत्ता झालेल्या मुली, महिलांच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक होताच.
मात्र, अजूनही ते प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो हे देशभरातील राज्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची नोंदणी करत असते.त्यांनी दाखल केलेल्या नोंदणीनुसार 2016 पासून2018 पर्यंतची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रात महिलांची बेपत्ता होण्याची नोंद सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 2016 मध्ये 24 हजार 937 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. तर 2017 ला 28 हजार 133 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. तर 2018 साली 31 हजार 299 महिला व मुली गायब झाल्या आहत. त्यामुळे वरील तीन वर्षात 84 हजार 369 महिला व मुली बेपत्ता आहेत.अशी ही मन सुन्न करणारी आकडेवारी पाहता हे प्रकार का घडतात? यावर उपाययोजना काय? याबाबत देशदूतने पोलीस प्रशासन, सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक,पालक यांच्याशी संवाद साधून घेतलेला आढावा.
मागील काही महिन्यांपासून महिला तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहे. यामुळे पालकांसह पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी तरुण व वयात आलेल्या मुली देखील घरी काहीच न बोलता अचानक बेपत्ता होत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा तपास करतांना मोठी अडचण येत आहे. दरम्यान, प्रशासनासह पालक तसेच समाजातील जबाबदार लोकांनी या विषयावर गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. मुुली बेपत्ता होण्याचे ज्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहे, त्या प्रमाणात मुलींचा शोध लागत नाही.
शहरात घरफोडी, मारहाण, खून, दरोडे, प्राणघातक हल्ले अशा घटना घडतात. त्याला रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच त्यांची टीम कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे. दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.नाशिक पोलिसांच्या रोजच्या दैनंदिन गुन्हे अहवालातून ही आकडेवारी समोर येत आहे.
आध्यात्मिकनगरी म्हणून प्रसिद्ध नाशिकमध्येही बेपत्ता होणार्या मुली आणि महिलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत असल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही मोठे आहे. बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असतील तर पोलिसात अपहरणाची नोंद केली जाते.मुली अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर केली जात नसल्याने त्याची स्वतंत्र नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर नाही. मात्र, सज्ञान मुलींच्या बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. बेपत्ता मुली व महिलांच्या नातेवाईकांनी नाशिक शहर पोलिसांत बेपत्ता झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, यासाठी अनेक मुलींचे कुटुंबीय पोलिसांत तक्रार देण्याचे टाळत असल्याचेही समोर आले आहे.
तीन महिन्यात राज्यात साडेपाच हजार मुली बेपत्ता
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 610 मुली बेपत्ता झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात 1,600 मुली-महिला बेपत्ता झाल्या. तर फेब्रुवारी महिन्यात 1,810 आणि मार्च महिन्यात सर्वाधिक 2,200 मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. यात 2,458 अल्पवयीन मुलींचा समावेश असून तशी नोंद पोलीस विभागाकडे असल्याची माहिती आहे.
18 ते 20 या वयोगटातील सर्वाधिक मुली
बेपत्ता होणार्या मुलींचे वय 18 ते 25 वयोगटातील असून यामध्ये मार्च महिन्यात महाराष्ट्रातून 2,200 मुली म्हणजे रोज सरासरी 70 मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 18 ते 20 या वयोगटातील मुली आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी होत्या. हे प्रमाण दुसर्याच महिन्यात 390 ने वाढल्याचे दिसून आले.
ग्रामीण भागात प्रमाण अधिक
शहरांपेक्षा ग्रामीण भागात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे मार्च महिन्यातील आकडेवारीतून समोर आले आहे. यामध्ये पुणे 228, नाशिक 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, अहमदनगर 101, जळगाव 81, सांगली 82 आणि यवतमाळ 74 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती आहे. तसेच हिंगोली 3, सिंधुदुर्ग 3, रत्नागिरी 12, नंदुरबार 14, भंडारा 16 याठिकाणी सर्वात कमी मुली बेपत्ता झाल्या आहेत.
30 टक्के मुलींचा शोध
राज्यात जवळपास 30 टक्के मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तर मार्च 2022 मधील 1695 मुली आजही बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे असल्याचे समोर आले असून, कागदोपत्री त्यांचा शोध सुरूच आहे.
नाशिक आघाडीवर
नाशिक शहरात जानेवारी ते 8 मे 2023 या कालावधीत तब्बल 956 मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस आयुक्तालयाकडे झाली आहे. या 956 पैकी 221 अल्पवयीन मुली आहेत. तर 18 वर्षांपुढील महिला तब्बल 735 आहेत. यातील अवघ्या 31 अल्पवयीन मुलींचा शोध लागला आहे. तर उर्वरित बेपत्ता मुली व महिलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मध्यवर्ती गुन्हे शाखेसह पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.
मुलींनी स्वसक्षमतेकडे आणि करिअरकडे लक्ष द्यावे
पोलीस प्रशासनाने बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे व त्यात चांगले यश मिळाले आहे.अधिक तर मुली ह्या प्रेमसंबंधातून असे पाऊल उचलतात, असे समोर आले आहे. अशा वेळेला पालकांची जबाबदारी खूप महत्त्वाची असते. आपले करिअर घडविण्याची ही वेळ आहे ही जाणीव मुलींना करून देण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. तसेच मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही याचाही परिणाम या वयातील मुलींवर जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद बाजूला ठेवून ते असे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे महिला देखील कौटुंबिक वादाला कंटाळून तसेच प्रेमसंबंधातूनच घर सोडून जात असल्याचे समोर येते. तरी पोलीस प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करून पळून गेलेल्या मुली, महिलांना आणण्यासाठी प्रयत्न करून त्यांचे कौन्सिलिंग करते.
डॉ. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे) नाशिक शहर