Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखसमान दृष्टिकोनाचा अभाव

समान दृष्टिकोनाचा अभाव

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.. असे साने गुरुजी म्हणाले होते. बस यही अपराध मैं हर बार करता हूं..आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ..अशा भावना गीतकार नीरज यांनी व्यक्त केल्या तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीतकार समीर सामंत यांचे मागणे आहे. तथापि माणसाला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटावी अशा घटना घडतात. पालकांच्या मनाविरुद्ध एका तरुणावर प्रेम केल्याची शिक्षा तिच्या वडिलांनी तिला दिली.

त्यांनी त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना नांदेडमध्ये घडली. दुसरी घटना अमृतसरमध्ये घडली. मुलगी दोन दिवस बेपत्ता होती. ती घरी परतताच तिच्या वडिलांनी तिला घरातून बाहेर नेले. तिची हत्या केली. त्याआधी तिला दुचाकी गाडीला बांधून फरफटत नेल्याचे स्थानिक लोकांनी माध्यमांना सांगितले. प्रेम करणे, जास्त काळ घराबाहेर राहाणे ही पोटच्या गोळ्याचा जीव घेण्याची कारणे होऊ शकतात का? मूल व्हावे ही प्रत्येक जोडप्याची अपेक्षा असते. ज्यांच्या बाबतीत त्या अपेक्षेची सहज पूर्तता होत नाही त्यांची मानसिकता संवेदनशील होते. मूल व्हावे म्हणून सतत प्रयत्न करतात. मुलगी जन्माला यावी अशी अनेक पालकांची इच्छा नसते. तथापि अशा वेळी मुलगी जन्माला आली तरी चालेल अशीच त्यांची भावना ते व्यक्त करताना आढळतात. तीच मुलगी जन्माला आल्यावर नकोशी का होते? किती मुलींना त्यांचा जीवनसाथी निवडण्याची मोकळीक दिली जाते? ठराविक वेळेची किंवा सातच्या आत घरात ही बंधने फक्त मुलींवरच लादली जातात हे वास्तव आहे. मुलगा आणि मुलीच्या संगोपनातील भेद हे देखील याचे एक कारण असावे. समाजरचना पुरुषप्रधान आहे. पालक मुलाला वंशाचा दिवा ती मुलीला जबाबदारी मानतात.

- Advertisement -

मुलीला परक्याचे धन म्हणूनच मोठे केले जाते. मुलाला सगळ्या प्रकारची मोकळीक आणि मुलीवर मात्र जास्तीत जास्त बंधने हे घराघरातील वास्तव आहे. अतिप्रेमाने मुले बिघडली तरी एकवेळ चालवून घेतले जाऊ शकेल कदाचित पण मुलींचे वर्तन सभ्य, प्रेमळ असावे, तिने खाली मान घालूनच वावरावे, मोठ्याने हसू नये, बोलू नये, रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू नये असेच पालक सुचवतात. मुले मात्र बंडखोर, आक्रमक आणि धाडसीच असावीत हीच पालकांची इच्छा असते. त्याचे तसे वर्तन खपवून घेतले जाते. बंधनांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य किती मुलींना दिले जाते? तसे धाडस दाखवणाऱ्या मुलींना शिक्षा देण्यास पालक कचरत नाहीत हे उपरोक्त घटनांनी अधोरेखित केले आहे. तथापि मुली अनेक क्षेत्रात भरारी घेतात. त्यांच्या पालकांचे नाव उंचावतात. अनेक मुले त्यांच्या आईवडिलांचा त्याग करतात पण अनेक मुली लग्नानंतर सुद्धा त्यांच्या आईवडिलांचा सांभाळ करतात. त्यांची काळजी घेतात. काळानुसार मुलगा आणि मुलीकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल का? मुलगा आणि मुलीत समानता राखली जाणे, त्यांच्यात भेदभाव न करणे ही काळाची गरज आहे. सगळी मुले सारखी हा समान दृष्टिकोन पालकांनी स्वीकारला तर मुलींना खोट्या प्रतिष्ठेचे आणि लौकिकाचे ओझे पेलावे लागणार नाही आणि पालकही ते त्यांच्यावर लादणार नाहीत. असे घडेल तो दिवस मुलींच्या बाबतीत सुदिनच ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या