Thursday, May 30, 2024
Homeअग्रलेखबंदीची वेळ का येते?

बंदीची वेळ का येते?

सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. हा विद्यार्थ्यांच्या मोठ्या सुट्टीचा महिना आहे. लोक सहकुटुंब पर्यटन करण्याला पसंती देतात. सामूहिक पर्यटनाला गती येते. तथापि तसे पाहिले तर अलीकडच्या काळात सर्वच ऋतूंमध्ये पर्यटन बहरते. पावसाळ्याचे वेध लागले आहेत. पावसाळी पर्यटन युवा पिढीत कमालीचे लोकप्रिय आहे. पर्यटन करताना सावधानता बाळगायची असते, अपघात घडू नयेत म्हणून दक्षता घ्यायची असते याची आठवण अनेक घटना करून देतात. पुण्यातील खडकवासला धरण परिसरात नुकतीच एक दुर्दवी घटना घडली. दुसऱ्या जिल्ह्यातून पर्यटनाला आलेल्या मुली धरणाच्या पाण्यात पोहायला उतरल्या आणि काही मुली बुडाल्या. त्यात दोन मुलींचा बळी गेला. उर्वरित मुलींचा जीव वाचवण्यात आजूबाजूच्या लोकांना यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणाच्या मागील बाजूच्या २० किलोमीटर पाणलोट क्षेत्राच्या परिघात पर्यटकांना जाण्यास निर्बंध घालण्याचा विचार सुरु असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. अशी बंदी घालायची वेळ प्रशासनावर का आली? पर्यटकांनी अती धाडस दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची ही पहिलीच घटना नाही. पर्यटकांचा जीव जाण्याच्या घटना याआधीही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. घडत आहेत. विशेषतः समुद्रकिनारे, धरणांचा परिसर, धबधबे, किल्ले अशा ठिकाणांवर पर्यटकांसाठी  सरकार वेळोवेळी  काही  निर्बंध जाहीर करते. तसे फलकही अनेक ठिकाणी लावले जातात. तथापि किती पर्यटक त्या सूचना गंभीरपणे घेतात? किती पर्यटक ते सूचनाफलक वाचतात? किंबहुना सूचनाफलकांकडे दुर्लक्ष करून मौजमजा करण्याकडेच अनेकांचा कल आढळतो. त्या बेफिकिरीतूनच अती धाडस केले जाते. अनेकदा ते अंगाशी येते. काहींना जीव गमवावा लागतो. एखाद्या ठिकाणी सरकार बंदी घालेल, फलक लावेल, ठिकाण फारच प्रसिद्ध असेल तर क्वचित पोलीस बंदोबस्तही लावू  शकेल. पण त्यापुढची काळजी मात्र पर्यटकांचा घ्यावी लागते याचे भान सुटते का? मौजमजेचे टोक गाठले जाते का? बेफिकिरी आणि धांगडधिंगा म्हणजेच पर्यटन मानले जाऊ लागले असावे का? नाशिक परिसरात काही ठिकाणी काजवा महोत्सव भरतो. त्यावर बंदी आणावी अशी मागणी त्या परिसरातील ग्रामस्थ करतात. हरिहर किल्यावर जाण्यासाठी वन खात्याची परवानगी बंधनकारक करण्यात आली. वास्तविक पर्यटन पूरक रोजगार निर्मिती करते. तरीही आमच्या परिसरात कोणताही महोत्सव भरवू नका अशी मागणी करण्याची वेळ का येते? याचा विचार पर्यटक करतील का? पर्यटन स्थळी अती धाडस टाळावे. सरकारी माहितीफलकांवरील माहिती गांभीर्याने वाचावी आणि त्या सुचना अमलात आणाव्यात. निसर्गाला गृहीत धरू नये. अतिरेक टाळावा. क्षणिक मोह जीवावर बेतू शकतो. याचे जरी भान राखले तरी पर्यटन आनंदात पार पडू शकेल. महामार्गांवर ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’ अशा मजकुराचा फलक लावलेला असतो. तोच पर्यटनच्या बाबतीतही लागू पडतो. हे कळण्यासाठी अजून किती दुर्घटना घडाव्या लागतील?

- Advertisment -

ताज्या बातम्या