Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधपाकिस्तान-तालिबानचे का बिनसले?

पाकिस्तान-तालिबानचे का बिनसले?

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने ज्या तालिबानला आपले हत्यार बनवले होते तोच तालिबान आज पाकिस्तानच्या गळ्यातील फास बनू पाहत आहे. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा सर्वात मोठा हितचिंतक बनण्याची पाकिस्तानची इच्छा होती, मात्र झाले उलटेच! सध्या ड्युरंड लाईनवरून तालिबान-पाकिस्तान हे आमने-सामने उभे ठाकले आहेत.

तालिबान आणि पाकिस्तानच्या नात्यामध्ये अखेरीस जे घडण्याची शक्यता होती तेच घडले आहे. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि बोलघेवडे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे तालिबानसाठी जगभरात समर्थन मागत फिरत आहेत. तर दुसरीकडे तालिबान ड्युरंड लाईन मानण्यास तयार नाहीये आणि त्याने पाकिस्तानच्या हद्दीत तोफांचा मारा सुरू केला आहे. इतकेच नव्हे तर तालिबानच्या सुरक्षेत असलेले तहरीक-ए-तालिबानचे दहशतवादी सातत्याने पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले करत आहेत. यामुळे दोघांमधील तणाव वाढला आहे. ड्युरंड लाईन हा 19 व्या शतकातील रशियन आणि ब्रिटीश साम्राज्यांमधील ग्रेट गेमचा वारसा आहे. तत्कालीन भयभीत ब्रिटीश साम्राज्याने पूर्वेकडील रशियन विस्तारवाद टाळण्यासाठी अफगाणिस्तानचा बफर झोन म्हणून वापर केला. 12 नोव्हेंबर 1893 रोजी ब्रिटीश नागरी सेवक सर हेन्री मॉर्टिमर ड्युरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात ड्युरंड लाईनवर स्वाक्षरी झाली होती. तथापि तालिबानची नवी राजवट ही ड्युरंड लाईन, त्याचे सीमांकन मानण्यास तयार नाहीये.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताने तेथे लावलेली विकासाची रोपटी सुकून जातील, कट्टरतावाद हा विकास गिळून टाकेल, असे वाटले होते. परंतु तसे घडले नाही. तेथील तालिबानी आजही भारताची प्रशंसा करतात. भारताने पाठवलेल्या मदतीबद्दल त्यांनी भारताचे आभारही मानले आहेत. आपल्या देशात भारताने सुरू केलेले प्रकल्प सुरू ठेवावेत, असे तालिबानी युद्ध सुरू असल्यापासूनच सांगत आले आहेत. याउलट जो पाकिस्तान युद्धकाळात तालिबान्यांचा हितचिंतक आणि सल्लागार होता त्याच्यावरच तालिबानी आता नाराज आहेत. भारताने नुकतीच अफगाणिस्तानात वैद्यकीय सामुग्री पाठवली. मदत साहित्यासह भारतात अडकून पडलेल्या 90 अफगाणी नागरिकांनाही विमानातून मायदेशी पाठवण्यात आले. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंदजे यांनी सांगितले की, भारताने 1.6 मेट्रिक टन जीवनरक्षक औषधे पाठवली आहेत. ही औषधे काबूलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात येतील आणि त्यानंतर काबूलच्या इंदिरा गांधी बालचिकित्सालयात ती पाठवली जातील. ममुंदजे यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मी ही मदत पाहून भावूक झालो आहे. भारताला धन्यवाद!

- Advertisement -

अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरण्यात येणार नाही, असे आश्वासन तालिबानने नेहमीच दिले आहे. भारतानेही आधीपासूनच अफगाणिस्तानात मानवतेच्या भूमिकेतून मदत पाठवली आहे. भारताकडून पाकिस्तानमार्गे 50 हजार टन गहू अफगाणिस्तानात पाठवला जाणार आहे. मानवतेच्या भूमिकेतून अफगाणिस्तानला मदत करणार असल्याचे अमेरिकेनेही म्हटले आहे. ही मदत थेट तालिबानच्या स्वाधीन न करता आंतरराष्ट्रीय मदतीचे वाटप करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारला जगातील सर्व देशांनी मान्यता द्यावी, असे पाकिस्तानला वाटते. परंतु अद्याप तरी तसे घडलेले नाही. युद्धात पाकिस्तानने तालिबानला उघड मदत केली. अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा सर्वात मोठा हितचिंतक बनण्याची पाकिस्तानची इच्छा होती, मात्र झाले उलटेच!

आपल्या देशातील हस्तक्षेपाबद्दल तालिबान पाकिस्तानवर आधीपासून नाराज होताच. त्यातच नांगरहार प्रांतात सीमेवर काटेरी तारेचे कुंपण उभारत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना तालिबानने नुकतेच रोखले. यावेळी काटेरी तारेसह अन्य सामुग्री तालिबानने जप्तही केली. पाकिस्तानी सैनिकांना तेथून पळून जावे लागले. या भागात तालिबानने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून टेहळणी सुरू केली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यान एकंदर 2600 किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. पाकिस्तानने आपल्या अनेक भागांवर कब्जा केला असल्याची तक्रार अफगाणिस्तान पूर्वीपासूनच करत आहे. या सीमेवर तारेचे कुंपण उभारून अफगाणी नागरिकांची ये-जा बंद करण्याचा पाकिस्तानचा इरादा होता. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचा प्रवक्ता इनायतउल्लाह खावर आजमी यांनी या घटनेला पुष्टी दिली आहे. पाकिस्तान नांगरहार प्रांतात काटेरी तारांचे कुंपण उभारू इच्छित असून आम्ही त्याला रोखले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे त्याने म्हटले आहे.

एकीकडे ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी इम्रान खान सरकारकडे केली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार सरहद्दीवर तारेच्या कुंपणाचे काम करू देत नाही तसेच दोन्ही देशांदरम्यानची सीमारेषा मानण्यासही तालिबान तयार नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. तालिबान सरकार जर पाकिस्तानी लष्कराकडेच डोळे वाटरून पाहत असेल तर इम्रान खान सरकार तालिबानला समर्थन का देत आहे? असा पाकिस्तानातील विरोधकांचा सवाल आहे.

भारत सरकारचे अफगाणिस्तानविषयक धोरण यशस्वी होत असल्याचे अफगाणिस्तानातील परिस्थितीवरून दिसून येते. दुसरीकडे तालिबानसाठी एवढे सगळे करूनसुद्धा पाकिस्तानला अफगाणिस्तानमधील तालिबानकडून विरोध सहन करावा लागत आहे.

एकंदरीत पाहता अफगाणिस्तानवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने ज्या तालिबानला आपले हत्यार बनवले होते तोच तालिबान आज पाकिस्तानच्या गळ्यातील फास बनू पाहत आहे. वास्तविक, अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित करण्यामागे पाकिस्तानचा खूप मोठा हात होता. मुळात तालिबानचा उगम हा पाकिस्तानात विद्यार्थी चळवळीतून झालेला आहे. आज तालिबान ड्रग्जमाफिया, शस्रास्रांची चोरटी आयात, रिअल इस्टेटमधील काळा पैसा या सर्वांशी जोडला गेलेला आहे. तालिबानला लष्करी साहित्य, शस्रास्रे, दारुगोळा यांची सर्व ती मदत पाकिस्तानकडून केली जाते. तसेच अमली पदार्थांच्या तस्करीतून, दाऊदासारख्या अंडरवर्ल्ड डॉनच्या व्यवसायातून आलेला पैसा हा तालिबानला आर्थिक रसद म्हणून पुरवला जातो. या सामरीक आणि आर्थिक भक्कम पाठिंब्यामुळे तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव करण्यात यश मिळवले. पाकिस्तानने हे करण्यामागचे कारण म्हणजे अफगाणिस्तानचे सामरीक स्थान. मध्य आशिया, पूर्व आशिया आणि पश्चिम आशिया या तिन्हींना जोडणारा देश म्हणून अफगाणिस्तानची ओळख आहे. त्यामुळे अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवल्याने या तिन्ही उपखंडांवर प्रभाव पाडणे सोपे जाते. त्यामुळेच पाकिस्तान अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी प्रयत्नशील होता. अमेरिकन फौजा माघारी फिरून तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर पाकिस्तानचे मोठे स्वप्न पूर्ण झाले. तालिबान हा होमोजिनियस किंवा एकजिनसी गट नाहीये. तालिबानमध्ये एकूण सहा प्रमुख टोळ्या आहेत. त्यांच्यात अंतर्गत मतभेद प्रचंड आहेत. त्यामुळेच ड्युरंड लाईनवरील वादावर पडदा पडल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा हा वाद उभा राहिला. येणार्‍या काळात तालिबानपुढे झुकायचे की त्यांना शह द्यायचा हा मोठा पेच पाकिस्तानपुढे आणि इम्रान खान यांच्यापुढे असणार आहे. कारण पाकिस्तानातील त्यांचे विरोधक आता तालिबानच्या मुद्यावरून इम्रान यांच्यावर ताशेरे ओढू लागले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या