श्रवण, लेखन, वाचन ही भाषेची प्रमुख तीन अंगे आहेत. त्यातूनच आपली भाषा संपन्न, समृद्ध होत असते आणि तिला अनेक वर्षांचा वारसा प्राप्त होतो. तिचे जतन केले जाते. त्यासाठी वाचन प्रक्रिया कशी मदत करते याविषयी..
आपण परस्परांशी संवाद साधत असतो तो आपल्या बोलीभाषेतून. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर ‘मराठी असे आमची मायबोली’ असणारी मराठी भाषा ही संत-पंत यांच्या परिसस्पर्शाने तयार होऊन आलेली आहे. खरे तर असे म्हणतात की भाषा ही दर बारा मैलांवर बदलत असते. ती भाषा बोलीभाषेच्या बाबतीत सत्य ठरते. पण व्यवहारात असलेली प्रमाणभाषा मात्र आज वेगळ्या वाटेने जात आहे असे दिसून येत आहे. बोली भाषांमधीलही अनेक भाषा आज बोलल्या जात नसल्याने कालांतराने त्याही काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. आणि मग या भाषेच्या माध्यमातून तयार होणारे लोकवाङ्मय, लोकसाहित्यही आपल्याला वाचायला, अभ्यासायला मिळणार नाही, अशी कुठेतरी भीती वाटते आहे.
श्रवण, लेखन, वाचन ही भाषेची प्रमुख तीन अंगे आहेत. त्यातूनच आपली भाषा संपन्न, समृद्ध होत असते आणि तिला अनेक वर्षांचा वारसा प्राप्त होतो. तिचे जतन केले जाते. भाषेची ही तिन्ही अंगे परस्परांना पूरक अशीच आहेत. जर आपल्याला चांगले काही ऐकायला मिळाले तरच ते आपल्या लेखनातून कागदावर उतरू शकते म्हणजे आपण काहीतरी लिहू शकतो आणि काहीतरी मधून उत्तमाचा ध्यास घेत अधिक चांगल्या लेखनासाठी आपण नवनवीन साहित्याचा शोध घेत त्याचे हव्यासाने वाचन करतो आणि मग या तिन्ही प्रक्रियांमधून आपली एक वैचारिक बैठक तर तयार होतेच पण आपल्या स्वत:मध्ये आत्मविश्वास, विविध अंगांनी विचार करण्याची क्रिया, अभिव्यक्ती, वक्तृत्व यांचे प्रकटीकरण दिसून येते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज आपण वाचन ही प्रक्रिया माणसाला कसे अधिक समृद्ध, संपन्न करते याचा अधिक सविस्तर विचार करूयात.
वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनीच म्हटले आहे की, वाचनाने जगणे सुंदर व जीवन संपन्न होते. किती खरे आहे हे वाचनाचा आनंद देणारे साहित्य म्हणजे पुस्तके ही एक अजब गुहाच म्हणायला हवी. स्वान्त सुखाय कथा – कादंबर्यांचे वाचन, अभ्यासासाठी केलेले वाचन, एखाद्या गोष्टींचा ध्यास घेऊन केलेले वाचन, अशा विविध अंगांनी केले जाणारे वाचन हे माणसाला जीवनाचे अनेक पैलू दाखवत असते. आणि म्हणून नाशिकमध्ये ज्यांनी वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने जे विविध उपक्रम हाती घेतले त्यांचा मला येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यातल्या ‘पुस्तकभिशी’ या एका उपक्रमाचा वाचनाशी अगदी जवळचा संबंध आहे म्हणून थोडे त्या अनुषंगाने लिहिणार आहे.
साधारणपणे 2000 मध्ये नाशिकमधील पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी मैत्रिणींनी एकत्र येऊन विविध पुस्तक भिशी गटांच्या माध्यमातून ‘अक्षरा वाचक चळवळ’ हा उपक्रम सुरू केला. खरे तर 1995-96 पासूनच नाशकात असे पुस्तक भिशीगट आपापल्या भागात कार्यरत होते. पुस्तक खरेदी, त्यांची देवाणघेवाण पुस्तकावर चर्चा, त्या अनुषंगाने लेखन अशा सहभागातून मैत्रिणी आपली वैचारिक भूक भागवत होत्या. पण अक्षराच्या माध्यमातून हे सर्व गट एकत्र आले आणि मग सगळ्या जणी अधिकाधिक समृद्ध होऊ लागल्या. पण काही कारणास्तव 2008-09 पासून अक्षराचा उपक्रम थांबलेला असला तरी वाचनप्रेमी मैत्रिणींचे त्यांचे त्यांचे पुस्तकभिशी गट आजही कार्यरत आहेत.
2001 मध्ये सुरू झालेल्या आमच्या रसिकगंधा पुस्तकभिशी गटाने अगदी प्रथमच ठरवून टाकले की पुस्तक खरेदी करतांना कथा, कादंबर्या खरेदी न करता इतर साहित्य प्रकारांची खरेदी करायची. मग पुस्तकांच्या जाहिराती, परीक्षणे यानुसार पुस्तके खरेदी केली जाऊ लागली. मग यात नव्या-जुन्या साहित्यिकांचा समावेश होऊ लागला. गौरी देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळकेंपासून डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले अशा सर्वच लेखक-लेखिकांची पुस्तके आमच्या खजिन्यात जमा होऊ लागली. आणि ती वाचता वाचता आमच्या वाचनाच्या कक्षा रुंदावू लागल्या. कधी कधी असे व्हायचे की एखाद्या विषयाकडे आपण कधीच वळलेलो नसायचे पण भिशीत जर त्यावर चर्चा झाली तर मग आवर्जून वाचनालयातून वा विकत घेऊन त्या लेखकाकडे वा पुस्तकाकडे आम्ही वळायला लागलो.
या लेखाच्या निमित्ताने मी रसिकगंधाच्या मैत्रिणींशी त्यांच्याशी बोलले, त्यांच्या मते विचारात घेतली. आमच्यातली मंजुषा काकतकर म्हणाली, मी पुस्तके पूर्वीपासूनच वाचत आहे पण पुस्तक भिशीत आल्यापासून माझ्या वाचनाला एक दिशा मिळाली. ज्या विषयांकडे मी कधीच वळले नसते त्या विषयांची पुस्तके मी वाचायला लागले. नीला कचोळे ही इंग्रजी पुस्तकांचे, लेखांचे अनुवाद करणारी मैत्रीण ती म्हणाली, ‘वाचनाचा फायदा मला अनुवाद करतांना नक्कीच झाला. कुठेही शब्दांशी न अडखळता सुलभ अनुवाद तर मी करू लागलेच पण मला एकेका शब्दाला चार-चार पर्यायी शब्द सुचू लागले.’ शब्दसंपत्ती वाचनामुळे वाढणे ही तर वाचनाची भक्कम जमेची बाजू.
वासंती खाडिलकर ही तर शब्दांशी खेळणारीच मैत्रीण आहे. कोडी तयार करणे. कोडी सोडवणे, प्रवासात हातात कागद-पेन घेऊन काना-मात्रा-वेलांटी नसलेले शब्द शोधणे, भाज्या-फुले, प्राणी, पक्षी यांची नावे अर्थ असणारे शब्द तयार करणे हे तिचे आवडते छंद. मग यातूनच अनेक नवीन वापरात नसणारे शब्द सापडत जातात. टापर-तळपायाचा मांसल भाग, कारा-लग्न न झालेला, मावभक्ती- खोटी भक्ती अशा असंख्य अनवट शब्दांनी वासंती गर्भश्रीमंत होत जाते आणि तिच्या या श्रीमंतीत ती प्रत्येक भिशीच्या वेळी आम्हाला सामील करू घेते. पत्रकार, लेखिका, वंदना अत्रे या आमच्या मैत्रिणीच्या लेखनातून लय-ताल असणारी सांगितिक भाषा सहज ताना-हरकतींनी आमच्यापर्यंत पोचते
. शोभना भिडेसारख्या हाडाची शिक्षिका व विज्ञानाचा ध्यास घेणार्या मैत्रिणीकडून आम्हाला वैज्ञानिक भाषेचा परिचय होत असतो. अशा या मैत्रिणींच्या आणि पुस्तकांच्या गराड्यात फिरत असतांना आम्हाला मीना प्रभुंची पुस्तके विविध देशांची सफर घडवून आणतात. डॉ. आनंद नाडकर्णींच्या पुस्तकांनी विवेकनिष्ठ विचारसरणी देऊन आपल्या वर्तनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन दिला. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणार्या डॉ. अनिल अवचट यांनी ललित लेख, प्रवास वर्णन, व्यक्तीचित्रे यांचे दर्शन घडवले तर लोकवाङ्मय काव्य यांची ओळख सरोजिनी बाबर, बहिणाबाई यांनी करून दिली.
शांता शेळके यांनी तर उत्तम काव्याबरोबर अनादि काळापर्यंत मराठी मनावर रेंगाळणारी गीते दिली. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. निरंजन घाटे, बाळ फोंडके यासारख्या वैज्ञानिक लेखकांनी कथा-कादंबरीच्या माध्यमातून सोप्या भाषेतून वैज्ञानिक अद्भूतं आपल्यापर्यत पोहोचवली. साहित्याच्या सर्व प्रकारांची भाषा ही वेगवेगळी असते. कथा-कादंबरी, नाटक, विज्ञान, ऐतिहासिक वाङ्मय या सगळ्यांचा भाषेचा बाज हा वेगवेगळा असतो आणि त्यानुसारच साहित्य निर्मिती होत असते. आणि अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण साहित्य, पुस्तके जर वाचली तर त्यातील भाषा, विशिष्ट शब्द यांचा आपल्याला परिचय होऊ शकतो. आणि त्यातूनच आपण आपोआप घडत जातो. अधिक वाचनाने एक प्रकारची समृद्धी येते. विचारांच्या कक्षा रुंदावतात. कोणत्याही घटनेकडे वा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. भाषा समृद्ध करणारे वाचन ही आपली अत्यंत निकड आहे. म्हणूनच दिसामाजि काहीतरी वाचत जावे हेच खरे. पण -हा पणच आज मोठा अडथळा बनत आहे.
कारण आज इंग्रजी ही जागतिक स्तरावरची भाषा असल्याने ती किती गरजेची आहे हे पटवून देणारा फार मोठा वर्ग समाजात तर आहेच. आपली मराठी भाषा लुप्त होऊन त्यावरील संदेशही मोबाइलवरुन इंग्रजी भाषेतून आणि तेही अत्यंत कमीत कमी शब्दांत पोचवले जात आहेत. त्यामुळे आजच्या मुलांजवळ भाषा समृद्धीचा तुटवडा जाणवत आहे. आपल्या आई-आजीच्या तोंडी असणारे अनवट शब्द, म्हणी या पिढीला तर माहीत होणारच नाहीत. एवढेच कशाला आज मोबाइल मेसेजमुळे पत्रलेखनाने साधला जाणारा भावनिक संवादही संपला आहे. परीक्षेतील मार्कांपुरते पत्रलेखन उरले आहे. पण त्यातील सा.न. (साष्टांग नमस्कार), अ आ. (अनेक आशीर्वाद), ता. क. (ताजा कलम) या शब्दांचा परिचय आणि त्यातील मौज त्यांना अनुभवताच येणार नाही. या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे आभासी जगाच्या महाजालात न फसता पुस्तकांच्या महाजालात मनसोक्त संचार करून त्याचा आनंद लुटावा. तरच 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची माय मराठी संपन्न, सुंदर आणि समृद्ध होईल.
सुषमा देशपांडे, नाशिक