Friday, May 3, 2024
Homeनाशिकअशी मानसिकता का?

अशी मानसिकता का?

सरिता पगारे, क्लिनिकल सायकाॅॅलोजीस्ट आणि समुपदेशक

राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाल्याची बातमी पुढे आली आहे. राज्यात दररोज सुमारे 70 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक माहिती राज्य महिला आयोगाने पुढे आणली आहे. कमी वयात मुली घर सोडून बेपत्ता का होतात याचे कारण एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत.

मुलींना फूस लावून पळवणे, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे, मुलींना वाईट मार्गाला लावणे, नोकरीचे आमिष दाखवून शोषण करणे अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय. मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत. 14 ते 17 या वयात शारीरिक बदल होतात. सोशल मीडिया, चित्रपटांमधील हिरोगिरीच्या आकर्षणाचा मुला-मुलींवर परिणाम होतो.

आई-वडिलांचे दुर्लक्ष

ज्या आई-वडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपले, वाढवले त्यांचा किंचितही विचार दुसर्‍याचा हात धरून पळून जाताना या मुलीच्या मनात येत नाही. तिने चुकीच्या मार्गाला लागू नये. या काळजीपोटी तिला थोडे फार दरडावले तर तो मुलींना मोठा अन्याय वाटायला लागतो. घरातील लोक अचानकपणे नकोसे होतात. आई-बापाच्या हतबलतेची तिला पूर्णत: कल्पना असते. किंबहुना, याच हतबलतेचा फायदा उचलत ती त्याच्याबरोबर पळून जाते. बरेचदा आई-वडिलांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष ही बाबही मुली पळून जाण्यास कारणीभूत ठरते. कामासाठी बाहेर पडल्यानंतर काही आई-वडिलांचे त्यांची मुले काय करतात याकडे लक्ष नसते. कामावरून आल्यानंतर सतत मुलांवर ओरडणे, चिडचिड करणे यामुळे मुले पालकांपासून दूर जातात. तसेच पालकांकडे मुले मन मोकळे करीत नाहीत. घरी असलेले काही आई-वडीलही त्यांच्याच नादात असतात.

पालकही मोबाईलच्या आहारी

मुले-मुलींबरोबर पालकही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत आहे. अशावेळी मुली प्रेमाचा आधार शोधण्यासाठी चुकीचे खांदे निवडतात. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये यासाठी कित्येक मुलींचे कुटुंबीय पोलीस ठाण्याला तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे बेपत्ता होणार्‍या मुलींची खरी आकडेवारी बाहेर येणे शक्य होत नाही.

संवाद साधणे महत्वाचे

आपल्या मुला-मुलींशी मैत्रीचे संबंध ठेवून त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधावा, मुला-मुलींच्या मित्रमैत्रिणींची माहिती घ्यावी. तसेच शाळा-महाविद्यालयातील पालक सभेला पालकांनी हजेरी लावावी, वयात आलेल्या मुला-मुलींना लैंगिकतेबाबतच्या चांगल्या-वाईट गोष्टीची माहिती द्यावी. ग्रामीण भागात अशी माहिती मित्र-मैत्रिणींकडून मिळाल्यानंतर उत्सुकतेपोटी मुले-मुली चुकीच्या मार्गावर गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून मुला-मुलींमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधून व्याख्यान देण्यात येणार आहेत. तसेच महिला पोलिसांमार्फत मुलींचे समुपदेशन करण्यात येणार आहे. घरातील मुलगी पळून गेल्यानंतर इतरांशी फार चर्चा न करता पोलिसांशी संपर्क साधावा.

स्मार्ट फोनचा योग्य वापर हवा

समाजाला काळानुरूप बदलत जावे लागते.तो बदलही आपण स्विकारतो.आज स्मार्ट फोनच्या माध्यमातून शिक्षण पध्दती आपण सहजपणे स्वीकारली पण आपला पाल्य या फोनचा चांगला वापर करतोय का हे पाहणे गरजेचे आहे.फोनसारख्या माध्यमातून फक्त वाईटच गोष्टी शिकता येतात असे नाही तर तो आपण कोणत्या कामासाठी वापरतोय यावर बर्‍याचशा गोष्टी अवलंबून असतात. पालकांना एक विनंती की मुलांवर कुठल्याही गोष्टी लादू नका.त्यांच्या कलेने त्यांना समजून घेणे आज गरजेचे वाटते. नाण्याला दोन बाजू असतात. हे लक्षात घेऊन स्मार्ट फोन असो किंवा गुगलवर सर्च करणे असो या गोष्टींचा उपयोग हा वैचारिक, शैक्षणिक गोष्टीसाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी असतो.हे एवढे पाल्यांच्या लक्षात आले की वाढत्या गुन्हेगारीला आपसूकच आळा बसेल. पालकांनी जागरूक राहण्याची गरज आहे असे वाटते.

शब्दांकन : मानस जोशी

- Advertisment -

ताज्या बातम्या