अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शिरूर तालुक्यातून नगरकडे येण्यासाठी निघालेल्या पती-पत्नीचे रस्त्यात कामरगाव (ता. नगर) शिवारात वाद झाले. या वादानंतर पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार घडला. पीडित पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पतीविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा प्रकार शनिवारी (29 जून) रात्री 10 ते सव्वादहाच्या दरम्यान घडला असून रविवारी (30 जून) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे पती शिरूर तालुक्यातील एका गावात राहतात. ते शनिवारी रात्री नगरमधील नातेवाईकांकडे येण्यासाठी निघाले असता रस्त्यात कामरगाव शिवारातील एका मंगल कार्यालयासमोर त्यांच्यात वाद झाले. या वादातून पतीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली.
‘तु पुरूषासोबत खुप बोलते, तुझे काय चाळे चालतात मला माहीत आहे’ असे म्हणून वाद घातला. पतीचा हा प्रकार पाहून फिर्यादी तेथून पळून जाऊ लागल्या असता त्याने दगड हातात घेऊन, ‘तु जर गेली तर मी दगडाने जीव घेईल’ अशी धमकी दिली. रात्रीची वेळ असल्याने फिर्यादी खूप घाबरल्या होत्या. दरम्यान, त्याने त्यांच्याकडे अनैसर्गिक कृत्य करण्याची इच्छा व्यक्ती केली. फिर्यादीने नकार दिला असता त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली व त्याने फिर्यादीसोबत अनैसर्गिक कृत्य केले. सदरच्या घटनेनंतर फिर्यादीला मानसिक धक्का बसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करत आहेत.