पुणे (प्रतिनिधी)
पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने पहाटेच्या सुमारास त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात समोर आली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०, रा. भोईर कॉलनी, लिंक रोड, चिंचवड) असे हत्या झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे, तर चैताली नकुल भोईर (वय २८) असे खून करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत नकुल भोईर हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते. त्यांचा पिंपरी चिंचवड भागात मोठा जनसंपर्क होता. ते मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमांमध्ये जिकरीने सहभाग घ्यायचे, तसेच राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार गट) विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. राजकीय नेत्यांशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते. विशेष म्हणजे, नकुल भोईर यांनी आपला सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी पत्नी चैताली हिला आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभे करण्याचा निर्णय घेतला होता. पती-पत्नी दोघांनी मिळून या निवडणुकीसाठी मोठी तयारी देखील केली होती. त्यांचे नगरसेवक बनण्याचे स्वप्न होते, मात्र त्यापूर्वीच हा दुर्दैवी प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैताली आणि मृत नकुल हे नात्याने पती-पत्नी होते. त्यांचे आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता. नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. याच संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद आणि भांडणं होत होती. शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात प्रकृतीने भारदस्त असलेल्या पत्नी चैतालीने ओढणीने पती नकुलचा गळा दाबून खून केला.
ही घटना चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घराच्या समोरील आरोग्य केंद्र इमारतीमध्ये उघडकीस आली. ज्यावेळी हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता, त्यावेळी त्यांचे पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आतील रूममध्ये झोपलेली होती. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. दरम्यान, पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी सुरू आहे. चैतालीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस घेत आहेत.




