Friday, November 13, 2026
Homeक्राईमCrime News : पत्नीला एक महिना कारावास; काय आहे प्रकरण?

Crime News : पत्नीला एक महिना कारावास; काय आहे प्रकरण?

बनावट फेसबुक अकाउंटव्दारे बदनामी केल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पत्नीला न्यायालयाने एक महिना साध्या कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून सादर करण्यात आलेले पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला.

- Advertisement -

या प्रकरणी अजित सुरेश नायडू यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी प्रियंका अजित नायडू ऊर्फ प्रियंका नटराज स्वामी हिने पती अजित यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्यासाठी एका मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. या अकाउंटवरून फिर्यादीचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सामाजिक बदनामी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांनी तांत्रिक तपास केला.

तपासादरम्यान आरोपी प्रियंका नायडू हिला 4 सप्टेंबर 2020 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तपास पूर्ण करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. पैठणकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अमित यादव, शेख आणि बाबर यांनी कामकाज पाहिले.

पोलिसांनी सादर केलेले तांत्रिक पुरावे आणि सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत दोषी ठरविले. त्यानुसार एक महिना साध्या कारावासाची आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाच्या तपासात अंमलदार राहुल हुसळे आणि सविता खताळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे पाटील तिसर्‍यांदा चेअरमनपदी; उपाध्यक्षपदी देशमुख नावाला तिसर्‍यांदा संधी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात विखे पाटील परिवाराला तिसर्‍यांदा चेअरमनपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, त्यांच्यानंतरमंत्री राधाकृष्ण...