Sunday, September 8, 2024
Homeनगररानभाज्यांबाबत अधिक जनजागृतीची गरज - आ. कानडे

रानभाज्यांबाबत अधिक जनजागृतीची गरज – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात. त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. त्यामुळे रानभाज्यांबाबत अधिक जनजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन आ. लहु कानडे यांनी केले.

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शासनाच्या कृषी विभाग आत्मा अंतर्गत पोलीस परेड ग्राउंडवर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन आ. लहु कानडे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अकोले येथील प्रगतिशील शेतकरी बाळू घोडे यांनी रानभाज्यांविषयी माहिती दिली. पावसाळ्यात विविध गुणधर्म असणार्‍या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात. रानभाज्यांचे पावसाळ्यात येण्याचे प्रमाण अधिक असले तरी वर्षभर ऋतुमानानुसार या भाज्या येतात. अनेक रानभाज्यांत शरीराला पोषक व औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात वेलीवर लागणारी कर्टुली ही रानभाजी गर्भवती आणि लहान बालकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. तिच्या बिया मुतखडा आणि जुनाट खोकला, वृद्धाच्या कफ विकारावर उपयुक्त असते. कुपोषणावर देखील रानभाज्या फायदेशीर आहेत. जून-जुलै महिन्याच्या पावसाबरोबर सुरू झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबरपर्यंत चालतो, असे त्यांनी सांगितले.

महोत्सवात पाथरी, कोळू, तेरे आळू, कोंबडा, गेठा, चाई, फांदा, आघाडा, भारंगी, तरवटा, थरमटा, कर्टुली, चित्रूक, आम्बुशी, हैदा, बडदा, खुरपुडी, कढीपत्ता, लोती, बाफळी, दिवा यासह विविध रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, दीपक पटारे, पी. आर. शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, रंजना पाटील, प्रांताधिकारी किरण सावंत, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, उपविभागीय कृषी अधिकारी अमोल काळे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन यांच्यासह मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, बीटीएम, एटीएम तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, शाळकरी मुले व शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या