भारत हा जैवविविधतेच्या दृष्टीने सर्वाधिक संपन्न देशांपैकी एक आहे. जगभरात आढळणार्या विविध प्राणीप्रजातींपैकी सुमारे 40 टक्के भारतात आढळतात. या सर्वच प्रजातींच्या संख्येत मोठ्या वेगाने घसरण होत आहे आणि कालौघात काही प्रजातींचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. प्राणीप्रजाती विलुप्त होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अकाली विलुप्त होत असलेल्या प्रजाती हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
दरवर्षी वन्यजीव दिवस साजरा केला जातो. पृथ्वीवर असणारे वन्यजीव आणि वनस्पतींमधील विविधता तसेच सौंदर्य यांचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जागरूकता, सहकार्य आणि समन्वय निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वन्यजीवांच्या विरोधात होणारे गुन्हे आणि मानवाकडून उत्पन्न विविध आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभावांमुळे प्रजातींची घटती संख्या याविरोधात एकजूट होण्याचा संदेश देणारा हा दिवस आहे. वास्तविक, जैवविविधतेच्या या संबंधीचे सर्व गणित ज्या गृहितकावर आधारित आहे, ते म्हणजे कोणत्याही वन्यजीवाच्या नैसर्गिक अधिवासांची संख्या 70 टक्क्यांनी कमी झाली, तर तिथे राहणार्या 50 टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरठ्याशी जाऊन पोहोचतील. विनाशाची स्थिती जर अशीच राहिली तर आगामी 25 वर्षांत 10 टक्के जीवप्रजाती या पृथ्वीवरून नामशेष होतील.
वॉशिंग्टन येथील विश्व संसाधन संस्थेच्या एका अनुमानानुसार, पुढील पन्नास वर्षांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर प्रजाती विलुप्त झाल्यामुळे कटिबंधीय वनांचा नाश होईल. पृथ्वीवर कटिबंधीय वनांचे क्षेत्र अवघे 7 टक्के असून, त्यात 50 टक्क्यांपेक्षाही अधिक प्रजाती आढळतात. ही जंगले केवळ वनस्पतींच्याच नव्हे तर वन्यजीवांच्या संख्येच्या दृष्टीनेही अधिक समृद्ध आहेत. एका अंदाजाच्या आधारे जगातील कोणतीही वन्यजीवाची प्रजाती विलुप्त झाल्यास त्याचा निसर्गाच्या संतुलनावर व्यापक परिणाम होतो. निसर्गाच्या एकंदर संरचनेत मानवाचे स्थान नगण्य आहे. तात्पर्य असे की, जर पृथ्वीवरून मानव विलुप्त झाला तर निसर्गाच्या संरचनेत कोणत्याही प्रकारचे असंतुलन निर्माण होणार नाही.
नैसर्गिक अधिवासांत अर्थात जंगलांमध्ये आढळणार्या जंगली जीवजंतूंना वन्यजीव असे म्हणतात. वन्यजीवांच्या दैनंदिन व्यवहारांमधून वनांची वाढ आणि पोषण होते. भारतीय उपखंडात वन्यजीवांच्या अशा काही दुर्मिळ प्रजाती आहेत, ज्या जगात अन्यत्र सापडत नाहीत. उदाहरणार्थ कस्तुरी मृग, चौशिंगा, काश्मिरी महामृग, नीलगाय, चितळ, कृष्ण मृग, एकशिंगी गेंडा, मणिपुरी हरिण, सांबर, गवा, रानडुकरे इत्यादी. पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वन्यजीवांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भारत हा जैवविविधतेच्या दृष्टीने सर्वाधिक संपन्न असणार्या देशांपैकी एक आहे. जगभरात आढळणार्या विविध प्राणिप्रजातींपैकी सुमारे 40 टक्के भारतात आढळतात. या सर्वच प्रजातींच्या संख्येत मोठ्या वेगाने घसरण होत आहे आणि कालौघात काही प्रजातींचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. प्राणिप्रजाती विलुप्त होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी अकाली विलुप्त होत असलेल्या प्रजाती हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
पर्यावरणीय परिस्थितींमध्ये होणारे अनावश्यक परिवर्तन, वन्यजीवांच्या अधिवासांचा विनाश, वनांचे निर्दयपणे केले जाणारे दोहन, पाळीव प्राण्यांना चारण्याच्या अशास्त्रीय पद्धती आणि तीव्र वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण ही प्राण्यांच्या प्रजाती अकाली विलुप्त होण्याच्या प्रक्रियेची मुख्य कारणे होत. निसर्गाने भारताला मुक्त हाताने दान दिले आहे. संपूर्ण जगाच्या क्षेत्रफळापैकी 2 टक्के जमीन आपल्याकडे आहे आणि या जमिनीवर जगातील 5 टक्के म्हणजे 75,000 जीवजंतूंच्या प्रजाती तसेच वनस्पतींच्या 45,000 प्रजाती आढळून येतात. नैसर्गिकरीत्या जीवजंतू आणि वनस्पतींच्या प्रजातींचा र्हास होत जाणे ही एक प्रचंड संथ प्रक्रिया आहे. परंतु आपल्या आधुनिकतेने वन्यजीवनाचे मोठे नुकसान केले आहे.
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नैसर्गिक संग्रहालयाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड ऑफ मॅमल्स या पुस्तिकेतील आकडेवारी अस्वस्थ करणारी आहे. या पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार, सस्तन वन्यजीवांच्या 81 प्रजाती संकटग्रस्त आहेत. काश्मिरी हरणांची संख्या घटून अवघी 350 एवढीच उरली आहे. भारतीय गेंड्यांचे भरभक्कम शरीर आणि शान पाहण्याजोगी असते. या गेंड्यांची संख्याही आता 8,000 पेक्षाही कमी उरली आहे. संपूर्ण जगात वाघांच्या 7 जाती पाहावयास मिळतात. आपल्या देशात या शतकाच्या पूर्वार्धात 10,000 वाघ होते. आज त्यांची संख्या घटून 2,000 उरली आहे. वानर वंशातील अनेक प्रजाती लुप्त होऊ घातलेल्या प्राण्यांच्या सूचीत नोंदविले गेले असून, काळ्या आणि पांढर्या बिबट्यांच्या अस्तित्वावर असलेले संकटही अधिक गडद झाले आहे.
शास्त्रज्ञांनी असा अंदाज बांधला आहे की, या पृथ्वीतलावर जीवजंतू आणि झाडाझुडपांच्या एकंदर 300 लाख प्रजाती आहेत. आतापर्यंत त्यापैकी अवघ्या 15 लाख प्रजातींचीच ओळख पटून त्यांचे विवरण तयार होऊ शकले आहे. त्यापैकी 724 प्रजाती लुप्त झाल्या असून, 22,530 प्रजातींवर लुप्त होण्याचे संकट आहे. या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार मानवाला जेवढा आहे तेवढाच तो अन्य प्राणिप्रजातींनाही आहे. वनस्पती, जीवजंतू आणि मानव यांचे अस्तित्व परस्परपूरक आहे. वन्यजीवांची हत्या करणे हा माणसाचा जन्मजात स्वभाव राहिला आहे, कारण प्रारंभिक अवस्थेत मानवाने याच प्राण्यांकडे भोजनाचा स्रोत म्हणून पाहिले. मध्ययुगात प्रतिष्ठा आणि मनोरंजन यासाठी शिकार केली जाऊ लागली आणि आजच्या युगात तर लाभदायक व्यवसाय म्हणून शिकारीकडे पाहिले जाते. असेच चालू राहिले तर काही दिवसांनी वन्यजीव केवळ चित्रातच पाहावे लागतील.
ब्रिटिश सरकारने वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी पहिला कायदा 1879 मध्ये तयार केला. वाइल्ड एलिफन्ट प्रोटेक्शन अॅक्ट असे या कायद्याचे नाव होते. या अधिनियमाचा व्यापक परिणाम झाला; परंतु वनांच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही प्रभावी प्रयत्न न झाल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. 1927 मध्ये वनांची सुरक्षितता, शास्त्रीय व्यवस्थापन आणि दोहन तसेच वन्यजीवांच्या हितासाठी भारतीय वन अधिनियम हा एक विस्तृत अधिनियम संमत करण्यात आला. या अधिनियमांतर्गत वन्यजीवांसंबंधीचे गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक व शारीरिक शिक्षेची तरतूद करण्यात आली. या सर्व परिस्थितीचा विचार करता, निसर्गातील वनस्पतींच्या प्रजाती आणि वन्य प्राणिप्रजाती यांच्या अत्यंत संतुलनात अत्यंत विचारपूर्वकच हस्तक्षेप केला पाहिजे. अन्यथा त्या हस्तक्षेपाच्या घातक परिणामांपासून मानवजातीचा बचाव होणे अशक्य आहे.