कॅन्सर हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी माणसांच्या छातीत धडधडते. डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता व्यक्त केली तरी या व्यक्तीला मृत्यू जवळ आल्याचा भास होतो. संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात अनेक प्रकारचे कॅन्सर बरे होऊ शकतात. तथापि या व्याधीतून आपण बरे होणार नाही याची माणसांना जणू खात्रीच पटलेली असावी. असे संसर्गाचा संशय व्यक्त झालेल्या माणसाचे अवसान गळून जाते. भारतात एकूणच कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
जागतिक स्तरावर महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा चौथा सामान्य तर भारतीय महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा प्रमुख कर्करोग मनाला जातो. दरवर्षी हजारो महिलांना या प्रकारच्या कॅन्सर संसर्गामुळे त्यांचा जीव गमवावा लागतो. २०२२ मध्ये जगात सहा लाखांपेक्षा अधिक केसेस होत्या. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू झाले. नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅमच्या नोंदणीनुसार भारतात हा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे उशिरा लक्षात येतात असे तज्ज्ञ म्हणतात. या कॅन्सरला आळा घालण्यासाठी लस उपलब्ध आहे. विशिष्ट वयोगटातील मुलींच्या लसीकरणासाठी अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्त पुढाकार घेतात. नाशिकमध्ये नुकतेच असे शिबीर पार पडले. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पुढाकाराने पार पडलेल्या शिबीरात सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त मुली व युवतींना गर्भाशय प्रतिबंधक लस देण्यात आली. योग्य वयात दिली गेलेली लस हा कॅन्सर होण्यापासून प्रतिबंध करू शकेल. म्हणजेच अनेकींच्या जीवाचा संभाव्य धोका टळू शकेल. रोटरीचा उपक्रम स्वागतार्ह आहे. लसीकरणाबरोबरच महिलांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे मोठेच आव्हान सामाजिक संस्थांनी पेलायला हवे. भारतात समाजरचनेत दिले जाणारे दुय्यमत्व महिलांच्या अंगी भिनलेले आढळते. त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेतात. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेतात. आहार आणि विहाराचे नियम पाळतात. तथापि त्यांची वेळ येताच अनेकींच्या मनातील दुय्यमत्व कदाचित उफाळून येत असावे. अर्थात आजाराच्या लक्षणांकडे महिलांनी दुर्लक्ष करण्याचे ते एकच कारण नव्हे. त्या आजारी पडल्या तर घरातील सदस्यांची काळजी कोण घेणार हा प्रश्न त्यांना सतावत असावा. तपासणी केली आणि एखाद्या जीवघेण्या व्याधीचा संसर्ग आढळला तर, ही भीती कदाचित त्यांना दखल घेण्यापासून रोखत असावी का? वैद्यकीय उपचार महागडे होत आहेत. घरच्यांना त्यांच्या आजारावर उगाचच पैसे खर्च करायला लागू नयेत अशीच बहुसंख्य महिलांची इच्छा असावी का? त्यामुळेही महिला त्यांच्या अनारोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असाव्यात. तथापि हीच बेपर्वाई किंवा निष्काळजीपणा कधीतरी त्यांच्या जीवाशी बेतू शकतो. कॅन्सरसारखी दीर्घ व्याधी जडू शकते. राज्य शासनातर्फे राज्यातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. वीस हजारांपेक्षा जास्त महिलांमध्ये कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आढळली होती असे वृत्त तेव्हा माध्यमात प्रसिद्ध झाले होते. तेव्हा महिलांमध्ये स्वआरोग्यविषयी जाणीव वाढवण्याची नितांत गरज शासन आणि सामाजिक संस्थांनी देखील लक्षात घ्यायला हवे. तसे ते घेतले जाईल का?