Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा पोटनिवडणूक लढवणार

विधानसभा पोटनिवडणूक लढवणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ( Kasba Peth and Chinchwad Assembly constituencies By -Election)महाविकास आघाडी लढणार ( Mahavikas Aaghadi)आहे. यासंदर्भात शिवसेना, काँग्रेसशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar)यांच्या अध्यक्षतेखाली काल पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी येत्या २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या दोन पोटनिवडणुका लढविण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. आजच्या बैठकीमध्ये संघटनेचा विस्तार, विधानपरिषदेच्या निवडणुका, चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय रणनीती असावी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चिंचवड आणि कसबापेठ या दोन्ही जागांसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, कॉंग्रेससोबत चर्चा करीत आहे. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणूका लढवल्या जाव्यात ही भूमिका आहे. याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितले जाईल, असेही पवार म्हणाले.

शिवसेना-वंचित युतीबाबत नाराजी नाही!

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. त्यांच्या युतीबाबत आमची कोणतीही नाराजी नाही. यासंदर्भात कोणीही गैरसमज पसरवू नका, असे आवाहन करतानाच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे अजित पवार यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. या भेटीत दोघांच्या युतीवर स्पष्टपणे चर्चा करून त्यानंतर आमची भूमिका मांडू. उद्धव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असेही पवार म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे. आम्ही सरकारमध्ये असताना मुंबई पालिकेत आम्हालाही सोबत घ्या, आपण सोबत काम करू असे सांगितले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण आता राजकिय परिस्थिती बदलली असली तरीही मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्यासोबत जाण्याची आमची मानसिकता आहे. कारण मुंबईत त्यांचा पक्ष मोठा आहे. एकमेकांशी संबंध जुळले, अडचणी आल्या नाहीत तर पुढे जायला काहीच अडचणी येत नाहीत, असेही पवार म्हणाले.

राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात आणि राजकीय भूमिका मांडावी लागते. युती-आघाडी करताना ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’ असे करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात, असे स्पष्ट मतही पवार यांनी व्यक्त केले.

युतीला आमचा विरोध नाही : जयंत पाटील

दरम्यान, शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही. परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केले. सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या