सटाणा । प्रतिनिधी Satana
बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचा डावा, उजवा कालवा तसेच केळझर धरण डावा कालव्याच्या वितरीका क्रमांक आठचे काम गेल्या 50 वर्षापासून अपूर्णावस्थेत रखडले आहे. समस्या तीच असली तरी लाभक्षेत्रातील विचारणारी माणसे व संबंधित अधिकारी बदलले आहेत. मात्र प्रश्न काही सुटत नाही. बागलाण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठी शासन कोणाचेही असो, मंत्री स्तर व संसदेत पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले.
पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रांताधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार कैलास चावडे, डॉ. दिनेश बच्छाव, गटविकास अधिकारी अतुल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कौस्तुभ पवार, कार्यकारी अभियंता मनोज डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी भैय्या सावंत, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, डॉ. विलास बच्छाव, गजेंद्र चव्हाण, केशव मांडवडे, संजय पवार, चेतन वणीस, भास्कर पाटील, श्रीकांत रौंदळ, प्रकाश देवरे, सुधाकर पाटील, राहुल पाटील, राजेंद्र जाधव, दिलीप पाटील, दिनकर आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या बैठकीत नव्याने बांधलेल्या पुन्हा धरण योजनेच्या अडीच किलोमीटर कामासाठी दहा कोटी रुपयांची मंजुरी मिळवून द्यावी, शहरासाठी दोन दिवसात फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जातो तो किमान तासभर करावा, शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला नगरपालिका हद्दीत असल्यामुळे कोणतेही अनुदान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल होत आहेत. त्यांना इतर प्राथमिक शाळांप्रमाणे निधी उपलब्ध करून द्यावा, शहरातील दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासद शेतकर्यांना आजपर्यंत पीएम किसान कार्डला पी एम किसान व्हिलेज कोड नसल्याने शासकीय योजनांपासून ते वंचित आहेत. तो लाभ मिळवून देण्यात यावा.
केसर धरण डाव्या व उजव्या कालव्याचे काम त्वरित पूर्ण करावे, पाटचारीची वहन क्षमता वाढवावी, नादुरुस्त पाटचारीमुळे पाण्याची गळती होऊन शेती नापीक होत आहे अशा ठिकाणी पाईपलाईनने पाणी पुढे न्यावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सटाणा शहर बायपास रस्ता, साक्री- शिर्डी महामार्गाचे रखडलेले काँक्रिटीकरणाचे काम तात्काळ मार्गी लावावे, संबंधित ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे प्रलंबित असलेल्या भाक्षी व पिंपळदर जल जीवन मिशन योजनेची कामे मार्च अखेर पूर्ण करून पाणीपुरवठा करावा या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
खासदार बच्छाव यांनी संबंधित कामात काही अडचणी असल्यास त्याबाबत पाठपुरावा करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी त्वरित संपर्क साधण्याच्या सूचना देत आणि त्या वर्षभरात हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची काही ग्वाही दिली. प्रास्ताविक किशोर कदम यांनी तर विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.