Friday, May 24, 2024
Homeनाशिकनिधी नियोजनाला मुहूर्त लागेल का?

निधी नियोजनाला मुहूर्त लागेल का?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचायतराज समितीच्या दौर्‍यापूर्वी व दौरा काळातही अत्यंत व्यस्त असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने दौर्‍यानंतर सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या दौर्‍यानंतर 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी नियोजनाचे वेध जिल्हा परिषद सदस्यांना लागले आहेत.

- Advertisement -

मागील तीन महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पीआरसीचे निमित्त करून नियोजनाबाबत कार्यवाही झाली नाही. यामुळे पंचायतराज समितीचे काम आटोपल्याने आता तरी प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी सदस्यांकडून होऊ लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ आता केवळ पाच महिन्यांचा उरला आहे. यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने ऑगस्टपूर्वी नियोजन करून ऑक्टोबरपर्यंत कामांना कार्यारंभ आदेश देण्यात यावे, अशी मागणी सदस्यांनी वेळोवेळी सभागृहात केली होती.

मात्र, प्रशासनाकडून दायित्व निश्चित करणे, निधीकपात असे मुद्दे पुढे केले. त्यानंतर सदस्यांनी आग्रह सुरू ठेवला असतानाच पंचायतराज समितीचा दौरा जाहीर झाला. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे या समिती दौर्‍यात व्यस्त झाले. यामुळे जवळपास महिन्यापासून नियोजनाच्या पातळीवर कोणतीही हालचाल झाली नाही. आता या समितीचा दौरा झाला असून, प्रशासनाने कामाला प्रारंभ करावा, अशी अपेक्षा सदस्यांकडून होऊ लागली आहे.

सभापतींनी लक्ष घालावे

सदस्यांच्या कार्यकाळाचे हे अखेरचे वर्ष आहे. यामुळे लवकर नियोजन करण्याची मागणी होती. मात्र, वेगवेगळ्या कारणांनी उशीर झाला आहे. आता प्रशासनाने वेगाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून विषय समित्यांसमोर विषय ठेवावे, सभापतींनीही नियोजनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजप, गटनेता, जि.प. नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या