Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदत्तक न घेता नाशिकचा विकास करणार : आदित्य ठाकरे

दत्तक न घेता नाशिकचा विकास करणार : आदित्य ठाकरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

मी नाशिक दत्तक घेणार नाही. दत्तक घेणे एवढा मी मोठा नाही, पण नाशिकचा विकास मोठ्या प्रमाणावर मी करणारच. येणारी ही निवडणूक ठरवणार की आपला महाराष्ट्र कुठे नेणार, सुवर्णकाळाकडे की अंधकाराकडे असे मत शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवीन नाशकातील पवननगर स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेप्रसंगी ठाकरे बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना सांगितले की , आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आपण ते स्वप्न नक्की खर्‍यात उतरणार की स्वप्नच ठेवणार याचा विचार आता मतदारांना करायचा आहे. लाडकी बहीण योजना पुरेशी आहे का? 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे भाजपने जाहीर केले होते. मात्र दहा वर्षांनंतर 2024 सालात त्याचे पंधराशे रुपये झाले आणि चुकून पुन्हा जर हे सरकार बसलेच तर त्याचे दीडशे रुपये देखील होतील.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत दाम दुप्पट म्हणजे महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये देणार, त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात व सर्व महापालिकांमध्ये सुरू असलेली बससेवा महिलांसाठी मोफत करणार. राज्यामध्ये 18 हजार महिला पोलिसांची भरती करणार व प्रत्येक शहरात एक महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करणार आहोत. यावेळी ठाकरे यांनी शेतकर्‍यांबद्दल बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी परिवारातील मुले स्वप्न घेऊन शहरात येतात. त्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमुक्ती करणार आहोत. सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. या सरकारने बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर निर्माण केली आहे.

महाविकासची सत्ता येताच प्रत्येक बेरोजगाराला चार हजार रुपये देणार. यासोबतच 25 लाखांपर्यंत दवाखान्यांमध्ये कॅशलेस सुविधा आम्ही देणार आहोत. यावेळी शिंदे सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले की, खोके सरकारने महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातला नेले. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावरून उठत महिलांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी खा. राजाभाऊ वाजे, खा. शोभा बच्छाव, माजी आमदार अपूर्व हिरे, शिवसेना उपनेता सुनील बागुल, शिवसेना उबाठा पक्ष जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गीते, विनायक पांडे, दत्ता गायकवाड , डॉ. डी. एल. कराड, विलास शिंदे, सीताराम ठोंबरे, अ‍ॅॅड. तानाजी जायभावे, वंदना पाटील, नाना महाले, डी. जी. सूर्यवंशी, सचिन राणे, दीपक दातीर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या