Tuesday, May 28, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

भाजपसोबत ( BJP ) जावे यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. मात्र माझ्या कुटुंबावर, ‘मातोश्री’वर घाणेरडे आरोप करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंढ नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला ठणकावले.

- Advertisement -

काहीजण म्हणत होते की मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले आहेत. ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिले आहे. मला या सगळया आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही. तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या राजकीय भवितव्याविषयी राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील घडामोडीमागे भाजपचा डाव असल्याचा आरोप केला.

मी वर्षा निवासस्थान सोडले म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा कधी विचार केला नव्हता. त्या पदाचा कधीच मोह मला नव्हता. आधी दोन वर्षे करोना होता. त्यानंतर मानेचे दुखणे लागले. पहिले ऑपरेशन झाले तेव्हा सगळे ठीक होते. पण एक दिवशी अचानक शरीराच्या काही भागांच्या हालचाली होत नसल्याचे दिसून आले. मग दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळीच विरोधकांनी डाव साधला. आदित्य ठाकरे त्यावेळी परदेशात होते. एकनाथ शिंदेंसोबत काही आमदार गुजरातला गेल्यानंतर काही आमदारांना बोलावण्यात आले होते.

यावेळी काही झाले तरी सोडणार नाही असे ते म्हणाले. दादा भुसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचे काय करायचे? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजवलेली मुळे आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेले ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठे केले त्यांची स्वप्ने मोठी झाली.ती मी पूर्ण करू शकत नाही. आपण प्रत्येक वेळी यांना महत्वाची खाती दिली. नगरविकास खाते नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते, पण ते मी यांना दिले. माझ्याकडे साधीच खाती ठेवली.

आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते आणि मी बडवा होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे. यांच्या मुलाला खासदार केले मग माझ्या मुलाने काहीच करायचे नाही का? असा भावनिक प्रश्न ठाकरे यांनी केला. जो कोणी समोर येईल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. शिवसेनेचा पहिला नारळ फुटला होता तशीच परिस्थिती आहे, असे समजा. तुम्हाला जिथे भवितव्य दिसत असेल तिथे खुशाल जा, मी थांबवणार नाही.

तुम्हाला वाटत असेल, तर सांगा मी आनंदाने हे पद सोडायला तयार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असे म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचे काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदे दिली, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असे वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका. मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असे विसरून जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडके अपत्य आहे.

– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या