Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्या‘नाफेड’ची कांदा खरेदी बंद करू; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचे उद्गार

‘नाफेड’ची कांदा खरेदी बंद करू; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचे उद्गार

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

कांदा भाव ( Onion Rate)कोसळल्यामुळे केवळ शेतकरी हित लक्षात घेऊन नाफेड( NAFED) हा पर्याय होता म्हणून फार्मर्स प्रोडुस कंंपनी या एजन्सीकडून तातडीने कांदा खरेदी सुरू केली. मात्र विरोधक आणि शेतकर्‍यांच्या संघटनांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे. शेतकर्‍यांना नाफेड परवडत नसेल तर नाफेडकडून होणारी कांदा खरेदी मागे घेण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांंनी येथे सांगितले.

नाफेड एजन्सीकडून लासलगाव-कोटमगावरोडवरील खरेदी केंद्रास राज्यमंत्री डॉ. पवार यांनी भेट दिली. शेतकरी आणि नाफेडच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांसमवेत लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, माजी जि. प. सदस्य डी. के. जगताप, शिवसेनेचे प्रकाश पाटील उपस्थित होते.

लाल कांद्याची टिकाऊ क्षमता कमी असते. म्हणून यापूर्वी कधीही नाफेडने लाल कांदा खरेदी केला नाही. सध्या शेतकर्‍यानां मिळणार्‍या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. म्हणून शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याशी संपर्क साधला. नाफेडकडे सक्षम यंत्रणा नसताना कांदा खरेदी सुरू केली आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल येताच सकारत्मक निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

नाफेडची खरेदी सुरू होण्याअगोदर 450 रुपये क्विंटल भावाने कांदा विक्री होत होता. आता 950 रूपये क्विंटल दराने विक्री होत असल्याने समाधानाचे वातावरण आहे, असा दावाही डॉ. पवार यांनी केला. नाफेडचे अधिकारी सुशील कुमार यांनी लासलगाव येथे दोन दिवसांत आणखी दोन खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

फार्मर कंपन्यांमार्फत थेट शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी निवृत्ती न्याहारकर व खडक माळेगावचे उपसरपंच विकास रायते यांनी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भुजबळांवर टीका

नाफेडकडे एवढी यंत्रणा नाही की ती प्रत्येक बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करेल. परंतु नाफेडने फार्मा प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे. कदाचित कंपनी नावामुळे हे फक्त व्यापारीच आहेत, असे आ. भुजबळ यांना असे वाटले का? जवळपास 2,400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली आहे. आपल्या जिल्ह्यातून जवळपास 677 शेतकर्‍यांच्या कांद्याची खरेदी नाफेडकडून झाली आहे. त्याची माहिती नाफेडकडे आहे. व्यापार्‍यांनी कांदा खरेदी केला, अशी एकही नोंद नाही, असे सांगून डॉ. भारती पवार यांनी छगन भुजबळांवर टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या