राज्यातील रस्त्यांचा दर्जा, खड्ड्यात गेलेले रस्ते हा टिंगलीचा, थट्टेचा आणि समाजमाध्यमांवर तिरकस विनोदाचा विषय झाला आहे. या मुद्यावरून कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी नेत्यांची गत झाली आहे. कुसुमाग्रजांचा आणि कानेटकरांचा वारसा सांगणाऱ्या सर्जनशील नाशिककरांनी यावर चक्क कवी संमेलन घेतले आणि ते यशस्वी करून दाखवले. कवींनी रस्ते बांधणाऱ्यांची चांगलीच पोलखोल केली. देश चंद्रावर गेला. सूर्याच्या दिशेने यान पाठवले. आता ‘मत्स्य ६०००’ ही समुद्रयान मोहीम हाती घेतली जाणार आहे. २०२४ साली बंगलाच्या सागरात याची चाचणी घेण्यात येणार आहे.
तंत्रज्ञानाचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात रस्ते खड्डेमुक्त आणि दर्जेदार बांधणे शक्य का होत नसावे की वर्षानुवर्षे रस्तेच बांधावेत अशीच सरकारांची इच्छा असावी? आयआयटी तंत्रज्ञांनी रस्त्यांची पाहणी केल्याचे वृत्त अधूनमधून प्रसिद्ध होते. तंत्रज्ञ फक्त पाहणीचा करत असावेत का? उपाय सुचवत नसावेत की ते स्वीकारले जात नसावेत? ग्रामीण भागातील सुमारे तीस हजार किलोमीटरचे रस्ते चकाचक करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्यासाठी सुमारे तीस हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे संबंधित मंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. चकाचक करणार म्हणजे नेमके काय करणार, त्यासाठी तीस हजार कोटी खर्च कसे करणार याचा खुलासा सरकार कदाचित नंतर करणार असावे. रस्ते चकाचक नसले तरी चालतील पण ते खड्डेमुक्त असावेत इतकीच लोकांची आता माफक अपेक्षा आहे. कोणतेही शहर स्मार्ट बनवण्यासाठी चांगले रस्ते बनवणे आवश्यक आहे. उत्तम दर्जाचे रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असे मुंबई उच्च नायायालयाने सुद्धा सरकारला बजावले. मीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणारी गैरसोय लोक वर्षानुवर्षे सहन करतच आले आहेत.
रस्त्यांअभावी ग्रामीण भागाचा विकास खुंटतो. आजारी लोकांना रुग्णालयात नेणे शक्य होत नाही. रुग्णालयाच्या रस्त्यावरच अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागतो. अनेक गावांमध्ये एसटी बस पोहोचत नाही. वाहने जाऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. पावसाळ्यात जीव धोक्यात घालून ओसंडून वाहणाऱ्या नदीचे पात्र ओलांडावे लागते. एखादा आदर्श (मॉडेल) रस्ता तयार झाला की त्याच्या राजकीय श्रेयाची लढाई समाज अनुभवतो. तथापि रस्त्याच्या तक्रारींना मात्र कोणीच वाली का आढळत नसावा? रस्त्यातील खड्डे, चुकीचे उतार, सिग्नल नसणे, चुकीचे वळणे हा दोष कोणाचा? खराब रस्ते हे रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण मानले जाते. रस्ते अपघातांमध्ये तरुणांचा मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. अकाली मृत्यूंचे पाप लोकांनी कोणाच्या माथी मारावे? सत्ताधारी येतात आणि जातात. त्यांचे पक्ष बदलतात. पण रस्त्यांचा दर्जा मात्र जैसे थे कसा राहत असावा? कोणी जादूगार जादू करतो की तो आर्थिक साखळीचा दुष्परिणाम असावा? सरकारने एकदाच काय तो खर्च करावा आणि फक्त ग्रामीण भागातीलच नव्हे तर राज्यातील सर्वच रस्ते दर्जेदार बांधावेत अशी लोकांची अपेक्षा आहे. पण ते ‘मुंगेरीलाल