महाराष्ट्रात सुमारे दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. ती संख्या दरवर्षी सुमारे चार लाखांनी वाढते असे सांगितले जाते. ज्येष्ठ नागरिक किंवा घरातील आजी-आजोबांना संस्काराची आणि मूल्यांची शाळा मानले जाते. जुनीजाणती माणसे त्यांचे वर्णन ‘घराचे कुलुप’ असे करतात. आजी-आजोबांच्या आणि नातवंडांच्या जिव्हाळ्याच्या अनेक गोष्टी लहानपणी प्रत्येकानेच ऐकल्या असतील. तथापि सद्यस्थिती काय आहे? अनेकांचे उतारवय वेदनामयी होत असावे का?. ज्येष्ठांसाठी सुरु झालेल्या हेल्पलाईनवर येणारे अनेक दूरध्वनी तरी हेच सांगतात. मुले सांभाळत नाहीत. पेन्शनची रक्कम काढून घेतात. आरोग्याची काळजी घेत नाहीत. दुर्लक्ष करतात. आदर देत नाहीत असेच बहुसंख्य तक्रारींचे स्वरूप असते असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. डोंबिवलीत घारीवली परिसरात एका घरात वृद्धेचा मृतदेह नुकताच सापडला. त्या एकट्याच राहात होत्या असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हंटले आहे. राज्यातील ही पहिलीच घटना नाही. अशा घटना अधूनमधून घडतात. वृद्धांच्या वाट्याला आलेले एकटेपण ही गंभीर सामाजिक समस्या आहे. काहींची मुले नोकरीनिमित्त दुसऱ्या गावी राहातात म्हणून आणि कुटुंबात राहूनही काहींच्या वाट्याला एकटेपण आलेले आढळते. एकटेपणाची कारणे काहीही असली तरी त्यावर शोधूनही उपाय सापडणार नाहीत का? डोंबिवलीसारखी एखादी दुर्घटना घडली की त्यावर चर्चा होते. उपाय शोधण्याची गरजही व्यक्त केली जाते. थोडा काळ जाताच वातावरण याहीबाबतीत शांत होते. ज्येष्ठांच्या प्रशासकीय स्वरूपाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि त्यांचे म्हातारपण आनंदात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मंडळे काम करतात. हास्यक्लब चालतात. अनेक सामाजिक संस्था त्यांचे समुपदेशन करतात. आवश्यक कामांसाठी मदतही करतात. सरकारच्या अनेक योजना असतात. तथापि मुले आणि नातवंडे आदर करत नाहीत आणि दुर्लक्ष करतात या स्वरूपाच्या तक्रारी समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावतात.एका ज्येष्ठ जोडप्याने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या मुलाच्या नावावर कोट्यवधीची संपत्ती आहे आणि त्यांचा नातू प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तीर्थस्थळी किंवा देवस्थानांच्या ठिकाणी काही दिवटे त्यांच्या वृद्ध पालकांना सोडून पळून जातात. आजारी पालकांना रुग्णालयाच्या दारात टाकून देऊन त्यांच्या मुलाने कारमधून पळ काढल्याच्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर कमालीचा व्हायरल झाला होता. भारतीय संस्कृतीचे दाखले जगभर दिले जातात. ज्येष्ठांचा मानसन्मान-आदर राखावा असे संस्कार लहानपणी केले जातात याचा अभिमान ठिकठिकाणी व्यक्तही केला जातो. घरातील लहानग्यांना त्या आशयाच्या बोधकथाही ऐकवल्या जातात. ती वीण विसविशीत होत असावी का? घरात वडीलधारे असावेत असे कुटुंबीयांना का वाटत नसावे? याचा विचार ज्येष्ठ आणि अन्य कुटुंबीय करतील का? घरातील ज्येष्ठांचा अनादर करून पुढच्या पिढीकडे कोणता वारसा सोपवत आहोत याचा विचार त्यांची मुले करतील का? काही अपरिहार्य कारणांमुळे अनके ज्येष्ठांचे एकटेपण टाळता येणारे नसूही शकेल. तथापि ते सुसह्य कसे होईल याविषयी समाजतज्ञ मार्गदर्शन करतील का? या गंभीर सामाजिक समस्येच्या कारणांचा शोध, त्यावर चिंतन-मंथन होऊन उपाय योजले जातील का? अन्यथा काळ सोकावण्याचा धोका नाकारता येईल का?