नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon
गिरणा उजव्या कालव्यातून मांजरे, सोनज, कौळाने, नगाव या गावापर्यंत हे पाणी येते. या कालव्याची रुंदी व त्यात पडलेला गाळ यामुळे हे पाणी कमी दाबाने या भागात येते. त्यामुळे या कालव्याची रुंदी वाढवून अधिक दाबाने या भागाला पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ठोस ग्वाही अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी या भागातील प्रचार दौर्याप्रसंगी दिली.
यावेळी भुजबळ म्हणाले की, पंकज भुजबळ आमदार असताना भुजबळ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून गिरणा उजवा कालव्याचे काम करण्यात आले. नंतर या कालव्यात गाळ साचत गेला. तसेच या कालव्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी येते. शेवटच्या टोकापर्यंत शेतकर्यांना सिंचनासाठी हे पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या मातीच्या कालव्याची रुंदी अधिक करणे तसेच त्यातील गाळ काढून अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास अडीचशे क्यूसेक दाबाने शेवटच्या टोकापर्यंत असलेल्या नगावलाही पाणी मिळेल. त्यामुळे या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न सुटेल. हा 24 कि.मी.चा कालवा असून त्याचे काम तातडीने करायला हवे. यासाठीच आपण मला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भुजबळ म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी येवल्यातील जनतेने नामदार छगन भुजबळ साहेबांना निवडून दिले. तेव्हापासून त्यांचा एकच ध्यास होता शेती सिंचनाला पाणी कसे आणता येईल आणि शेती कशी बहरेल. यासाठी त्यांनी अहोरात्र काम करून थेट डोंगरगावपर्यंत हे पाणी आणले. त्यामुळे पाणी कसे आणायचे, ते कुठे उपलब्ध आहे याचा सर्वच अभ्यास आता भुजबळ कुटुंबियांचा झाला आहे. म्हणून ही कामे अधिक ताकदीने करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळेच मी तुम्हाला तो शब्द देत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रावरील 9 क्रमांकाच्या शिट्टी निशाणीवरील बटण दाबून मला विजयी करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.