अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खांडके (ता. नगर) येथील विंड इंडिया लि. (पॉवरकॉन) या पवनचक्की प्रकल्पातील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून दरोडा टाकणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. प्रशांत बाळू चांदणे (वय 22, रा. सोनेवाडी, ता. नगर), मोबिन मेहबूब अन्सारी (वय 25, रा. कॅम्प कैलारू, सर्जेपुरा) अशी त्यांची नावे आहेत. 6 मे 2024 रोजी विंड इंडिया लि. (पॉवरकॉन) पवनचक्की प्रकल्प खांडके येथे अनोळखी पाच ते सहा व्यक्ती दोन टेम्पो व एका दुचाकीवरून आले. त्यांनी तेथील सुरक्षा रक्षक चंद्रकांत ठोंबरे यांचे हातपाय बांधून ठेवले.
दरम्यान ठोंबरे यांनी त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून प्रकल्पाचे सुपरवायझर संभाजी पालवे यांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. संशयित आरोपींनी सुपरवायझर व सुरक्षा रक्षक यांच्यासोबत झटापट करून त्यांना मारहाण केल्याने ते जवळील मेहकरी गावात गेले व गावातील लोकांच्या मदतीने संशयित आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एक टेम्पो, एक दुचाकी व चोरी केलेले विद्युत वाहक तार सोडून पळून गेले. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार भाऊसाहेब काळे, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे व अरूण मोरे यांचे पथक तपास करत असताना संशयित आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली व सोडून गेलेल्या वाहनांची तपासणी केली असता दुचाकी प्रशांत बाळु चांदणे याची असल्याचे समोर आले. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदार मोबिन अन्सारी, सुरजीत गुंजाळ (रा. माथनी, ता. नगर), महेश पवार (रा. निबोंडी, ता. नगर) व त्याचे दोन मित्र यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबूली दिली. पथकाने त्यांचा शोध घेतला असता मोबिन मेहबुब अन्सारी मिळून आला. गुंजाळ व अन्सारी यांच्याकडे गुन्ह्यात चोरी केलेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी तो माल भंगार व्यवसायिक सागर कुकरेजा (रा. नगर) यास विक्री केल्याचे सांगितले. भंगार व्यावसायिक कुकरेजा यांचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.