नागपूर | प्रतिनिधी Nagpur
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार सत्ताधारी पक्षाने विरोधकांना मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी’ येथे चहापानासाठी निमंत्रण दिले होते; मात्र दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने आणि त्यामुळे संविधानाचा अवमान झाल्याचा आरोप करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना (ठाकरे) गटाचे भास्कर जाधव, सुनील प्रभू, अॅड. अनिल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी (शरद पवार) गटातून फक्त अनिल देशमुख उपस्थित होते. वडेट्टीवार यांनी सांगितले की 1980 आणि 1985 मध्ये भाजपकडे अनुक्रमे 14 आणि 16 आमदार असतानाही त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळाले होते; मात्र सध्याचे सरकार भीतीपोटी हे पद रिक्त ठेवत आहे.
राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून 9.32 लाख कोटींचे कर्ज असून उत्पन्नाचा 22% हिस्सा व्याजफेडीत जात असल्याचा त्यांनी आरोप केला. विकासकामांमध्ये मुंबई–पुणे–ठाणे येथेच निधी दिला जात असून राज्यभर निकृष्ट कामे व भ्रष्टाचार वाढल्याचा त्यांचा आरोप आहे.
वडेट्टीवार यांनी बीडमधील सरपंच हत्याकांडातील आरोपी अद्याप फरार असल्याचे, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर कारवाई न झाल्याचे नमूद केले. उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या जमिन खरेदी प्रकरणात एकतर्फी कारवाई होत असल्याची ही टीका केली.
शेतकरी दररोज आत्महत्या करत असून कर्जमाफीवर केवळ आश्वासने देण्यात येत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कापसावरचा आयातकर शून्य केल्याने राज्यातील उत्पादक अडचणीत असल्याचेही त्यांनी म्हटले.
भास्कर जाधव यांनी निधीवाटपात प्रचंड भेदभाव झाल्याचा गंभीर आरोप करत विरोधी आमदारांच्या मतदारसंघांना निधी न देणे, तर सत्ताधाऱ्यांना हजारो कोटींची उपलब्धता आणि त्यातील 15% ‘कमिशन’ची प्रथा असल्याचे सांगितले. लोकशाही प्रक्रियेचा अवमान होत असून अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचा त्यांनी इशारा दिला.




