Thursday, November 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

मतदार संघाच्या विकासासाठीच अजितदादांसोबत : ना. नरहरी झिरवाळ

शरदचंद्र पवार आजही दैवत असल्याचा पुनरुच्चार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात जनतेने आपल्याला विकासासाठी निवडून दिले. विकासासाठी आपण अजितदादा पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबलो. शरदचंद्र पवार आजही आपले दैवत आहे. परंतू आपण केलेली विकासकामे विरोधकांना सहन होत नसल्याने हतबल झाले आहे. तथापि कोणताही गैरसमज न करता समर्थक कार्यकर्ते आणि जनता घड्याळालाच मतदान करेल, असा दावा केला असून आपण केलेल्या विकासामुळे विरोधक हतबल झाले आहे, असा उपरोधिक टोला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लगावला आहे.

- Advertisement -

लोखंडेवाडीसह पूर्व भागात महायुतीच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ना. झिरवाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी भास्करराव गायकवाड होते. दिंडोरी – पेठ विधानसभा मतदारसंघात ना. नरहरी झिरवाळ यांचे जागोजागी पारडे जड होत चालले असून, पूर्व भागात अनेक गावांमध्ये एकतर्फी मतदान घड्याळाला होईल, असे चिन्हे दिसत आहे. जोपूळ, लोखंडेवाडी, राजापूर, खेडगाव आदी गावांमध्ये ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद लाभला.या सभेमधूनच सर्वच नागरिकांनी ना. नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मते देवू असा निर्धार व्यक्त केला आहे.

ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, मी घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवली आणि पाचव्यांदा घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवत आहे. मी आहे त्याच पक्षात आहे. त्यामुळे मी गद्दारी केली कुठे? ना. शरद पवार हे आजही माझे दैवतच आहे त्यात बदल कुठे आहे. दिंडोरी – पेठ तालुक्यातील जनतेने मला विकासकामांसाठी निवडून दिले होते. त्यामुळे विकास करण्यासाठीच आणि जास्तीत जास्त निधी दोन्ही तालुक्यांना मिळवून देण्यासाठीच मी अजितदादा पवार यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालो. त्यानंतरच प्रचंड निधी तालुक्याला आला. त्यामुळे माझी चूक काय? वर केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यातही महायुतीचेच सरकार आहे.

भविष्यातही महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या सहकार्‍यांने कोट्यावधी रुपयांचा निधी दिंडोरी मतदार संघात आला. भविष्यातही आपल्याला हाच प्रगतीचा वेग कायम ठेवायचा आहे. म्हणूनच आपण घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. दिंडोरीच्या उज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा मला निवडून द्यावे, असे ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

22 हजार कोटींचा एकदरे पाणी प्रकल्प मतदार संघात
दिंडोरी । महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीमुळेच दिंडोरीच्या पूर्व भागात पाणी खेळते करु शकलो. मागील काळात वळण योजनांची कामे मार्गी लावली. त्याचे पाणी ओझरखेड, करंजवण, वाघाड, पालखेड, पुणेगाव, मांजरपाडा- देवसाने प्रकल्पात आले. त्याचा फायदा पूर्व भागातील शेतीला झाला. आता पुन्हा एकदा सरकारने दिंडोरी – पेठ तालुक्यात अधिकाधिक पाणी मिळावे, यासाठी एकदरे, गोदावरी, नदीजोड प्रकल्पाला 22 हजार कोटींची मान्यता दिली आहे. त्याचे पाणी वाघाड धरणातच पडणार आहे. तेथून ते पूर्व भागाकडे प्रवाहित होईल, त्याचा फायदा सर्व तालुक्याला होणार आहे. जानोरी, शिवनई, अक्राळे, मोहाडी परिसरातील शेतकर्‍यांचा त्याचा फायदा होंणार आहे. ही विकासकामे करतांना निधीची आवश्यकता पडणार आहे. त्यावेळी केंद्राची सुध्दा मदत लागणार आहे. म्हणूनच आपल्याला राज्यात महायुतीचे सरकार निवडून आणावे लागणार आहे. त्यामुळे दिंडोरीत सुध्दा आपण घड्याळ चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावे, असे आवाहन ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.

..तर तुम्ही मला गावातउभे केले असते का?
दिंडोरी । निवडणूक जाहीर होईपर्यंत माझ्याकडे विविध विकासकामे करण्याची साद घालत काही जण कामे मिळविण्यासाठी मागे पुढे फिरत होते. तेव्हा त्यांना मी गद्दार वाटलो नाही, पण आता त्यांना कोणता साक्षात्कार झाला की ते आरोप करत आहे. बदलत्या राजकीय घडामोडी मी मतदारसंघाच्या विकासासाठी अजितदादांना साथ दिली अन कोट्यावधींची विकासकामे मंजूर केली. ही कामे प्रगतिपथावर आहे. जर घड्याळसोबत राहिलो नसतो तर विकासकामेच झाली नसती? मग तुम्ही मला गावात तरी उभे केले असते का? असा सवाल करत विरोधकांच्या भुल्थापांना बळी न पडता दिंडोरी – पेठच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी मला यापूर्वीप्रमाणे मला साथ द्या, असे आवाहन महायुतीचे उमेद्वार ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.

स्थानिकांंना रोजगारासाठी कायदा आणणार : झिरवाळ
दिंडोरी । दिंडोरी तालुक्यात नव्याने अक्राळे, जांबुटके एमआयडीसी आणल्या असून तेथे अजून काही प्रकल्प येत आहे. त्यासाठी केंद्र सरकार सुध्दा मदत करीत आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी कंपन्यांनी सहकार्य करावे म्हणून विधानभवनातच कायदा करुन घ्यायचा असा आपला मानस आहे. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होणार आहे. दिंडोरी – पेठ मतदार संघातील युवकांना 30 टक्के प्राधान्य राखीव ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. मराठा आरक्षण प्रश्नी आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आपल्या उडी मारण्याने केवळ आदिवासी समाजाच नाही तर मराठा, ओबीसीसह सर्वच समाजातील पात्र युवकांना फायदा झाला. आपला अपप्रचार करणार्‍या विरोधकांमध्ये पेसा कायद्याच्या अभ्यास नसून त्यांनी कधीही आपल्याबरोबर समोरासमोर चर्चा करावी, असे आपले चॅलेज आहे, असे ना. नरहरी झिरवाळ म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या