Monday, October 14, 2024
Homeनगरविना परवानगी विद्यार्थ्यांची ध्वनीचित्रफीत तयार केल्यास पोक्सोअंतर्गत गुन्हा

विना परवानगी विद्यार्थ्यांची ध्वनीचित्रफीत तयार केल्यास पोक्सोअंतर्गत गुन्हा

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील विविध शाळांमध्ये शाळांशी संबंधित नसलेले काही लोक विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ध्वनी चित्रफिती तयार करून विविध समाज माध्यमांमध्ये प्रसारित करत असतात. त्यातून शाळांची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्म सन्मानाला धक्का लागतो ही बाब लक्षात घेऊन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विनापरवानगी अशाप्रकारे ध्वनी चित्रफिती निर्माण करणार्‍यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने शाळांना बदनाम करू पाहणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, काही शाळांमध्ये शालेय कामकाजाशी संबंधित नसणार्‍या व्यक्ती विनापरवाना शाळेत येऊन शालेय कामकाजामध्ये हस्तक्षेप करतात. विद्यार्थ्यांचे चित्रीकरण करतात. त्याचा वापर शाळांच्या अपप्रचारासाठी करत असल्याचे आढळून आले आहे. त्याआधारे शालेय व्यवस्थापनास धमकावणे सारख्या घटना समोर आल्या आहेत. ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस व शैक्षणिक वातावरणास बाधा पोहोचवणारी आहे.

याप्रकारच्या मार्गाने शालेय परिसरात गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवरती बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 (पोस्को) च्या कायद्यातील कलम 23(1) नुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे प्रसार माध्यम, स्टुडिओ किंवा फोटोग्राफी सुविधांच्या माध्यमातून कोणतीही परिपूर्ण किंवा प्रमाणिकृत माहितीशिवाय कोणत्याही बालकासंबंधी कोणताही अहवाल देणार नाही किंवा कोणतीही टिप्पणी करणार नाही. ज्यायोगे बालकांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल किंवा त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे.

भारतीय दंड संहिता 1860 कलम 353 नुसार लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे हा गुन्हा आहे.

या दृष्टीने अधिकार क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय आवारात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे व्यतिरिक्त अन्य कोणासही शाळेमध्ये किंवा शालेय आवारात प्रवेश करण्यास वा चित्रीकरण करण्यास संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे छायाचित्र प्रसारण चुकीचे

अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे छायाचित्र काढून विविध समाज माध्यमांवर प्रसारित केले जाते. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक वरती मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र वेगवेगळ्या मार्गाने प्रसारित केले जातात. पालकाच्या पूर्व परवानगीशिवाय अशा प्रकारचे विद्यार्थ्यांचे छायाचित्र प्रसारित करणे हे बेकायदेशीर आहे असे अभ्यासकांचे मत आहे. मात्र राज्यात सर्वत्र अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या छायाचित्र, ध्वनी चित्रफितीचा विनापरवानगी तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. या प्रकारचे निर्देश देण्यात आल्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांच्या संबंधीचे छायाचित्र अथवा ध्वनी चित्रफिती निर्माण करताना काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

छायाचित्रांचा गैरवापर

विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित झाल्यास समाजातील विकृत मंडळी या छायाचित्रांचा गैरवापर करत असताना समोर आले आहे. त्यातून अनेकदा विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचल्याचे यापूर्वी समोर आल्याने या संबंधित कारवाई करण्याची मागणी सातत्याने समोर येत होती. मात्र आता वरिष्ठ कार्यालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचे जतन होण्यास मदत होणार आहे. मध्यंतरीच्या कालावधीत राज्यातील काही स्वयंघोषित समाजसेवकांनी शाळेमध्ये येऊन विद्यार्थी, शिक्षकांसोबत दादागिरी करत गैरवर्तन केले होते. त्यासंबंधीच्या व ध्वनी चित्रफिती समाज माध्यमातून शाळा व प्रशासनाची बदनामी केली होती. त्यामुळे राज्यभर हा विषय चर्चेला आला होता. विनापरवानगी अशाप्रकारे ध्वनी चित्रफिती तयार करणे हे बेकायदेशीर होते, मात्र आता त्या स्वरूपाचे निर्देश देण्यात आल्याने कारवाईचा मार्ग सुलभ झाला आहे.

गटशिक्षणाधिकार्‍यांची परवानगी अनिवार्य

कोणत्याही शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांचे छायाचित्र अथवा चित्रफिती तयार करायच्या असल्यास यापुढे तालुका स्तरावरील शैक्षणिक प्रशासनाचे प्रमुख असणारे गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांचा गैरउपयोग थांबण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या