अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतीच्या वादातून एका महिलेस दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वाळकी (ता. अहिल्यानगर) शिवारात शेत गट नंबर 359 मध्ये मंगळवारी (22 एप्रिल) सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. यात मिरा बबन कासार (वय 50, रा. शिरकांड मळा, वाळकी) या जखमी झाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब महादेव कासार, स्वाती देविदास कासार, प्रवीण तुळशिराम कासार, महेश तुळशिराम कासार, देविदास बाबासाहेब कासार, जनाबाई बाबासाहेब कासार, कोमल प्रवीण कासार (सर्व रा. वाळकी, ता. अहिल्यानगर) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व साक्षीदार संशयित आरोपींनी शेतात टाकलेले दगड उचलत असताना संशयित आरोपींनी ही शेती आमची आहे असे म्हणत, फिर्यादी व साक्षीदारांवर दगड फेकून मारहाण केली.
त्यानंतर शिवीगाळ करत तुमच्यातील प्रत्येकाला ठेचून टाकू, तुम्हाला जेसीबीच्या बकेटखाली गाडून टाकू अशी धमकी दिली. तसेच विहिरीवरील पाणी वापरल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी तालुका पोलिसांनी भेट दिली असून गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार माने करत आहेत.