पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 12 लाख रुपये आणावेत, यासाठी होणार्या छळाला कंटाळून महिला डॉ. गौरी सुनिल चौरे (वय 26, रा. काळपट्टी वस्ती, गोरेगाव, ता. पारनेर) हिने आत्महत्या केली. गोरेगाव (ता. पारनेर) येथे ही घटना शनिवारी (दि.2) सकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी पती अमित दळवी, सासू संगीता दळवी, सासरे बाळासाहेब हरिभाऊ दळवी या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील जबाजी चौरे (वय 54, रा. गोरेगाव) यांची मुलगी गौरी हिने बीएचएमएस ही पदवी घेतली होती. तिचा 23 नोव्हेंबर 2024 रोजी अमित बाबासाहेब दळवी (मूळ रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, हल्ली रा. तपोवन रस्ता, सावेडी) याच्याशी विवाह झाला. अमित हा मुंबई येथे एका खासगी कंपनीत कामाला होता.
विवाहानंतर तीन महिने सासरी चांगले नांदविले. गौरी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. त्यानंतर मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी 12 लाख रुपये आणावेत, यासाठी छळ सुरू केला. तिने ही बाब माहेरी सांगितली. माहेरच्यांकडून 12 लाख रुपये देण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितले. त्यानंतरही सासरी छळ सुरू राहिला.
अमितने 27 एप्रिलला डॉ. गौरी हिला गोरेगाव येथे आणून सोडले. अमित वडिलांना अहिल्यानगरला सोडून येतो, असे म्हणून निघून गेला. दुसर्या दिवशी गौरी अहिल्यानगरला आईसमवेत घरी गेली असता, या ठिकाणी कुलूप लावलेले होते. दरम्यान, सासरी होणार्या छळाला कंटाळून तिने शनिवारी (दि.2) सकाळी साडेसातच्या दरम्यान सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.





