अहिल्यानगर (प्रतिनिधी)
बाभुळगाव (ता. राहुरी) येथे सासरी होणार्या मानसिक व शारीरिक छळामुळे त्रस्त झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती कैलास पाराजी पाटोळे, कमल पाराजी पाटोळे (दोघे रा. बाभुळगाव, ता. राहुरी), उत्तम महादु पाटोळे व शामल उत्तम पाटोळे (रा. कादंबरीनगर, पाईपलाईन रस्ता, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती कैलास पाटोळे, कमल पाटोळे, उत्तम पाटोळे व शामल पाटोळे यांनी तिला वेळोवेळी मारहाण केली. लग्नात मिळालेले सोन्याचे दोन ते तीन तोळे दागिने संशयित आरोपींनी तिच्याकडून घेतले होते. दागिने परत मागितल्यावर फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच, पती कैलास पाटोळे याने तिच्या माहेरून 10 लाख रूपये गाडी खरेदीसाठी आणण्याची मागणी करत वारंवार मानसिक त्रास दिला.
या छळास कंटाळून तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात 17 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम 85 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत.