अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव देवी मंदिर परिसरात ‘नाजूक’ कारणातून एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (24 फेब्रुवारी) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. संगीता नितीन जाधव (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, खून करणारा व्यक्ती पसार झाला असून त्याचा शोध कोतवाली पोलीस घेत आहे.
संगीता जाधव या त्यांच्या बहिणीकडे केडगाव येथील घरी आल्या होत्या. त्यांच्या ओळखीचा एक व्यक्ती त्यांच्या सोबत होता. रात्री जेवण झाल्यानंतर ते दोघे बहिणीच्या घरातील रूममध्ये झोपण्यासाठी गेले. त्या ठिकाणीच त्या व्यक्तीने संगीता यांचा कापडाने गळा आवळला. संगीता याचा ओरडण्याचा आवाज येताच त्यांची बहिण व इतर नातेवाईकांनी रूमकडे धाव घेतली. संगीता बेशुध्द अवस्थेत होत्या. त्यांना रूग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरचा प्रकार ‘नाजूक’ कारणातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.