अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महिलेच्या फोटोखाली अश्लिल मजकूर टाकून तो तिच्या मुलाला व्हॉट्सअॅपवर पाठविला. तसेच सोशल मीडियावर टाकून महिलेची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपनगरात राहणार्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका मुलीसह तिच्या वडिलांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानिका विष्णू माने, विष्णू माने (दोघे रा. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचा मुलगा व सानिकाची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती.
सानिका दोन वेळा फिर्यादीच्या घरी आल्याने फिर्यादी सोबतही तिची ओळख झाली होती. फिर्यादीचा मुलगा व सानिका दोघे फोनवर बोलत होते. दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी असताना सानिकाने मुलाला फोन करून तुझ्या व्हॉट्सअॅपवर एक फोटो टाकला आहे व तोच फोटो माझ्या इंस्टाग्रामवर पण टाकला असल्याची माहिती दिली. त्याने तो फोटो पाहिला असता त्यावर अश्लिल भाषेत मजकूर टाकण्यात आला होता.
त्याखाली त्याचा व फिर्यादीचे दोन मोबाईल नंबर टाकण्यात आले होते. तो फोटो व मजकूर वाचून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतरही सानिका व तिच्या वडिलाने फोन करून फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पीडित फिर्यादीने बुधवारी (25 सप्टेंबर) सायंकाळी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सानिका म्हस्के व तिच्या वडिलांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विश्वास गाजरे करत आहेत.