अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा पोलीस दलात अंमलदार पदावर नोकरीला असलेल्या विवाहितेचा पैशासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती भरत सुदाम गोरे, सासरे सुदाम शंकर गोरे, सासू विमलबाई सुदाम गोरे, दीर महेश सुदाम गोरे, जाव प्रियंका सुदाम गोरे (सर्व रा. आंबिलवाडी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी विवाहनंतर सासरी श्रीकृष्ण कॉलनी, समर्थनगर, केडगाव तसेच वाकोडी फाटा व आंबिलवाडी येथे नांदत असताना त्यांचा मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2024 दरम्यान छळ करण्यात आला.
पतीसह पाच जणांनी त्यांच्याकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. शेती कामाला, दीराच्या लग्नासाठी, शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचे सांगून वेळोवेळी पैशांची मागणी केली. घरात किरकोळ घरगुती कारणावरून शिवीगाळ करून पतीने त्यांच्या घरच्यांच्या सांगण्यावरून दारू पिऊन मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतू ‘तु जर मला घटस्फोट दिला तर मी आत्महत्या करीन व तुला व तुझ्या घरच्यांना आत्महत्याच्या गुन्ह्यात अडकवील’ अशी पतीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.